न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२३) :- प्रभाग क्र. २८ रहाटणी, पिंपळे सौदागर येथील स्वराज गार्डन शेजारील सर्वे न. २१ मध्ये आरक्षण क्र. ३६१ नुसार गार्डनचे आरक्षण आहे. ते बदलून त्याजागी जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉल विकसित करण्यात यावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपळे सौदागर या प्रभागात महानगरपालिकेच्या वतीने सर्व सोयी-सुविधायुक्त असे ३ गार्डन व २ प्ले ग्राउंड विकसित करण्यात आले आहेत. नागरिक देखील त्याचा मनसोक्त पद्धतीने आनंद घेतात. परिसरात एकूण २३० व त्यापेक्षा जास्त निवासी सोसायटी आहेत.
त्यामधील सर्व नागरिकांना जलतरण तलाव व बॅडमिंटनच्या सरावासाठी पिंपरी, कासारवाडी, पिंपळे गुरव, थेरगाव, खासगी ठिकाणी जावे लागते. त्यामुळे स्वराज गार्डन शेजारील आरक्षण क्र. ३६१ मधील गार्डनचे आरक्षण बदलून त्याजागी जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉल तयार करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

















