- तरुणांना मिळणार कौशल्य, नोकरी आणि मार्गदर्शन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत आज सिम्बॉयसिस स्कील्स ऍण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी व लाईट हाऊस यांचे समवेत सामंजंस्य करार करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य इमारतीमधील आयुक्त कक्षात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी अतिरीक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त अजय चारठाणकर, सिंबायोसिस स्किल्स अॅन्ड प्रोफेशनल युनिवर्सिटीच्या प्राचार्य डॉ स्वाती मुजुमदार, गौरी शिवरकर, लाईट हाउसच्या संचालक रुची माथूर आदी उपस्थित होते.
ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क प्रोग्राम हा जागतिक पातळीवर युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे. हा कार्यक्रम लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनद्वारे नोव्हेंबर २०१९ पासून चालवला जात आहे आणि आता त्याचा विस्तार पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये केला जात आहे.
दि. ६ जून २०२३ रोजी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पुढील ५ वर्षात पिंपरी चिंचवड शहरामध्ये वर्ल्ड ऑफ वर्क सेंटर सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. वर्ल्ड ऑफ वर्क हा कार्यक्रम हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्कचा हा मुख्य प्रकल्प आहे. ह्या प्रकल्पाद्वारे हजारो तरुणांना भौतिक करिअर मार्गदर्शन केंद्रे, हेल्पलाइन, यूथ कनेक्ट डिजिटल प्लॅटफॉर्म मार्फत रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. कार्यक्रमाची रचना आणि आराखडा शहरामध्ये उपजीविका साक्षरता प्रस्थापित करण्यावर केंद्रित आहे. अशा प्रकारे कमी उत्पन्न असलेल्या समुदायांमध्ये राहणाऱ्या १८-३५ वयोगटातील तरुणांसाठी कौशल्य, नोकरी आणि मार्गदर्शन मिळविण्याची सुवर्ण संधी आहे. हा कार्यक्रम तरुणांना त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी, लघु व्यवसाय स्थापित करण्यासाठी देखील मदत करणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून वर्ल्ड ऑफ वर्क प्रकल्प पुण्यामध्ये राबविला जात आहे. या प्रकल्पामार्फत २५ हजार तरुणांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झाला असून त्यापैकी १० हजार तरुणांचे समुपदेशन करण्यात आले आहे. त्यांपैकी २ हजारपेक्षा जास्त लोकांनी नोकरी केली आहे किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. त्यापैकी काहींनी औपचारिक शिक्षणात पुन्हा प्रवेश केला आहे आणि १० वीचे शिक्षण पूर्ण केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील कमी उत्पन्न असलेल्या समुदायांमध्ये राहणाऱ्यांसाठी उपजीविकेच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. या उपक्रमात कौशल्य तसेच नोकरी देणाऱ्या संस्था, समुदाय आधारित संस्था, निधी देणाऱ्या संस्था, महाविद्यालये, एनजीओ, लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.
सिम्बॉयसिस स्कील्स ऍण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्या वतीने शहरातील होतकरू आणि गुणवंत अशा ५५ मुलींना दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी येणाऱ्या खर्चास महानगरपालिकेच्या वतीने अर्थसहाय्य दिले जाणार आहे. प्रशिक्षण देण्यासाठी पहिल्या टप्प्यात शहरात १६ केंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहिती समाज विकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी दिली.
















