न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 01 जूलै २०२३) :- समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सने दुभाजकाला धडक दिल्यानंतर लगेच पेट घेतलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सुमारे 26 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
बुलढाण्याच्या सिंदखेड (राजा) परिसरात आज रात्री दीड वाजता हा अपघात झाला. या अपघातात वर्धा येथील 14 प्रवासी असल्याची माहिती आहे.
विदर्भ ट्रॅव्हल्स ही नागपूर येथून काल दुपारी चार वाजता निघाली होती. कारंजा (लाड) येथून जेवन घेऊन ती पुण्याकडे रवाना झाली होती. या ट्रॅव्हल्समध्ये दोन चालक, एक क्लीनर आणि 30 प्रवासी, असे एकूण 33 महिला, पुरुष आणि बालक प्रवास करीत होते.
ट्रॅव्हल्सचा टायर फुटून ट्रॅव्हल्स दुभाजकावर धडकली नंतर पलटी झाली मग ट्रॅव्हल्सने पेट घेतला, असा हा घटनाक्रम असल्याची माहिती ट्रॅव्हल्सच्या चालकाने दिली आहे.समृद्धी महामार्गावर जखमींना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. बसमध्ये वर्धा जिल्हातील काही प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती बुकिंग ऑफिस कडून प्राप्त झाली. यामध्ये प्रवाश्यांचे संपूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही. सदर बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष (07152-243446) अथवा शुभम घोरपडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (8888239900) यांच्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
मृतदेहांची ओळख पटवणे कठीण…
जे लोक या अपघातातून बचावले आहे त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जे लोक काचेची खिडकी हाताने फोडून बाहेर निघू शकले त्यांचा जीव वाचला आहे. बसमधून 25 मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले आहेत. जे मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आले आहेत, त्यांची ओळख पटवणे अडचणीचे होत आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शोक आणि मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर…
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत.
















