- चाकण आणि भोसरीतील गुन्हे उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२३) :- रेशन व सिलेंडर टाकी घेण्यासाठी आण्णा नाना पवार हे दुचाकीवरुन नारायणगाव येथे जात होत. दरम्यान पुणे- नाशिक रोडवर चाकण येथे अचानक पाठीमागुन स्पोर्ट बाईकवरुन आलेल्या उंच-धिपाड इसमाने त्यांना धमकावले. दोन-तीन वेळा हाका मारुनसुध्दा थांबला नाहीस, असे म्हणुन गाडी साईडला घेण्यास सांगितली. आण्णा पवार यांनी घाबरुन गाडी साईडला घेतली. क्राईम ब्रँच पोलीस अधिकारी असल्याचे कार्ड दाखवुन गांजाची चेकींग चालू आहे, असे सांगुन त्यांची अंगझडती घेतली. खिशातील मोबाईल, पैसे, डायरी, गळ्यातील चैन असे गाडीचे डीकीत ठेवण्याचा बहाणा करून हातचलाखीने ३६.६५० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरुन नेली.
भोसरी येथील पुलाखाली वृध्द महीला कलावती बबनराव कांबळे या नातीला उसाचा रस पाजुन घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. एका इसमाने त्यांच्याजवळ येवून ३० तोळ्याचे सोन्याचे गठुडे पडले आहे. तुम्हाला सापडले का असे विचारले. पुन्हा दुस-या इसमाने येवून तिस-या इसमाकडे बोट दाखवुन त्याला सोन्याचे गठुडे मिळाले आहे. त्याला २२ लाख रुपये देवू व सोने वाटून घेवू, अशा भुलथापा मारल्या. वृध्द महीलेने पैसे नसल्याचे सांगितल्याने तिचे गळयातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठन देण्यास सांगुन बनावट सोन्याचा तुकडा देवून फसवणुक करून पसार झाला.
वारंवार पोलीस बतावणीचे गुन्हे घडल्याने पोलीस आयुक्त यांनी विशेष मोहीम राबवून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेला आदेश दिले होते. या गुन्हयांचा गुन्हे शाखा युनिट २ कडून समांतर तपास सुरु असताना चाकण, भोसरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांची सातत्याने तपासणी करुन सदरचा गुन्हे इराणी गुन्हेगारांनी केल्याचे निष्पन्न केले. इराणी गुन्हेगारांच्या गुन्हा करण्याच्या पध्दतीचे परिपुर्ण ज्ञान व ठाव ठिकाणांची माहीती असलेले माहीतगार सहा. पोलीस फौजदार शिवानंद स्वामी यांना गोपनिय बातमी मिळाली.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार आबालु जाफर इराणी (रा. इराणीवस्ती, शिवाजीनगर, पुणे) याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने सदरचे गुन्हे केले आहेत. (दि २९) रोजी आबालु इराणी हा निगडी परिसरात आला असल्याची माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गणेश माने व गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार यांच्या पथकाने सापळा लावून आबालु इराणी यास शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी आबालु इराणी याचेकडे क्राईम ब्रँच पोलीस अधिकारी असल्याची एकूण ४ बनावट ओळखपत्रे मिळुन आली. त्या अनुषंगाने त्याचेकडे कसून चौकशी करुन चाकण व भोसरी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हयांमध्ये फसवणुक करुन चोरलेले ५ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व गुन्हा करणेसाठी वापरत असलेली महागडी स्पोर्ट बाईक असा एकूण सुमारे ४ लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपी हा बतावणी करून फसवणुक करणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याने पुणे, सातारा, नाशिक, ठाणे जिल्हा, भाईंदर, खंडाळा, भोईसर या ठिकाणी एकूण २० गुन्हे केलेले आहेत. आरोपीत याचेकडे गुन्हयांबाबत सखोल तपास करुन तपासावरील गुन्हयाचेकामी चाकण पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
पोलीस दलाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, पोलीस असल्याची बतावणी करुन सोन्या-चांदीचे दागीने रोख रक्कमेची फसवणुक करुन चोरी केली अशी घटना घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कक्षाशी तात्काळ संपर्क साधुन माहीती द्यावी.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी, केराप्पा माने, उषा दळे, देवा राऊत, विपुल जाधव, आतिष कुडके, नामदेव कापसे, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर, संदेश देशमुख यांनी केली आहे.
















