न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२३) :- अजित पवारांनी राज्यातील सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय हा राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या हितासाठीच घेतलेला निर्णय आहे. याआधी शिंदे फडणवीस सरकार स्थापन करण्यामागे सर्वसामान्य माणसाचे हित हेच ध्येय होते, असे प्रतिपादन आमदार श्रीकांत भारतीय यांनी केले. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे महासचिव व विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय हे पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलताना श्रीकांत भारतीय म्हणाले की, घेतलेला निर्णय हा सामान्य माणसाच्या हिताचा अजेंडा असेल तर, तो निर्णय जनता नक्कीच स्वीकारते. अजित पवार राज्यातील सत्तेत सामील होत असताना सामान्य जनतेच्या हितासाठी म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी हेच देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे, असे दुसऱ्या एखाद्या पक्षाला वाटावे हे खूप महत्त्वाचे ठरते.
२०१४ ते २०१९ च्या सरकारने केलेल्या कामगिरीवर निवडणुकीत जनतेने कौल दिला होता. २०१९ ला सत्तेत आलेले सरकार हे न्याय तत्वाचे सरकार नव्हते, त्यामुळे जनतेच्या मनातील सरकार यावे यासाठी प्रयत्न झाले व तसेच सरकार सत्तेत आले आहे.
श्रीकांत भारतीय एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, “आम्ही कोणताही पक्ष फोडलेला नाही, तेच इकडे आले आहेत”. अजित पवारांच्या सिंचन घोटाळा बाबतच्या आरोपाबाबत बोलताना श्रीकांत भारतीय म्हणाले की, मुळात अजित पवार भारतीय जनता पार्टीत आले नाहीत, तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सहभागी झाला आहे. सिंचन घोटाळ्यातून कोणताही क्लीन चीट अजित पवार यांना देण्यात आला नसून त्याबाबत चौकशी चालू आहे.












