न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ ऑगस्ट २०२६) :- शिवतेज नगर चिंचवड येथील घरकुल चौकाजवळ श्री स्वामी समर्थ मंदिर येथे श्रावण मास निमित्त नागपंचमी उत्सव आणि शिवपुराण कथा वाचनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक व ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
नागपंचमी उत्सवात सोमवारी (दि.१७ ऑगस्ट), सकाळी १० वाजल्यापासून शिवतेज नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात महिला व युवतींसाठी झिम्मा, फुगडी, फेर, झोका, उखाणे, गाणी, नृत्य अशा पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रविवार (दि. १६ ऑगस्ट) ते रविवार (दि. २३ ऑगस्ट) पर्यंत रोज दुपारी ४ ते ६ या वेळेत श्री स्वामी समर्थ मंदिरात हभप अमर महाराज काकडे (आळंदी) हे शिवपुराण कथेचे वाचन करणार आहेत. त्यांना महेश गव्हाणे (तबला) आणि वैभव महाराज (हार्मोनियम) साथ देणार आहेत.
या कार्यक्रमाच्या आयोजनात सारिका रिकामे, स्नेहा गुणवंत, क्षमा काळे, गीता पाटील, विद्या दुदुसकर, नीलिमा भंगाळे, स्मिता शिरसाट, मंगल काळे, छाया महाजन, अश्विनी केवाडकर आणि हरिनारायण शेळके काका, राजीव गुणवंत, दीपक बिरादार, चैतन्य बनकर, मेघराज बागी, रोहन नंदनवाड आदींनी सहभाग घेतला आहे.


















