- शिवसेना शहराध्यक्ष चेतन पवार यांचा आयुक्तांना दहा दिवसांचा अल्टीमेटम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते तसेच सोसायट्यांच्या परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. पावसामुळे शहरातील विविध प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते आणि सोसायट्यांच्या परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खड्डे अधिक धोकादायक ठरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविण्याची विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
खड्डे बुजविण्याचे काम तातडीने सुरू करून निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना सुरक्षित आणि सुस्थितीतील रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
१० दिवसांची मुदत…
खड्डे बुजविण्याबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करत पवार यांनी महापालिकेला १० दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत योग्य ती कार्यवाही झाली नाही, तर नागरिकांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शहरातील खड्ड्यांमध्ये उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा अत्यंत गंभीर प्रश्न असल्याने महापालिका प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घ्यावी. शहरातील सर्व रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याची कार्यवाही तातडीने करावी आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात यावी, अशी ठाम मागणी चेतन पवार यांनी केली आहे.


















