- काळेवाडी पोलीस चौकीजवळच दोघांची हातात कोयते घेऊन दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जुलै २०२३) :- जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी दोघांनी हातात कोयते घेऊन फिर्यादीवर कोयत्याने हल्ला केला. तो वार फिर्यादीने चुकविल्याने तो फिर्यादीच्या हिरो स्प्लेंडर या दुचाकीच्या टाकीवर लागला. त्यानंतर त्या दोघांनी हातातील कोयते हवेत फिरवून ‘हम यहाँ के भाई है, जो भी हमको क्रॉस करेगा उसको जिंदा नही छोडेंगे’ असे आरडा ओरड केल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. तसेच त्यांनी फिर्यादीच्या गाडीचे नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ३) रोजी रात्री ०९:३० च्या सुमारास एस. के. कॅटल फिड्स नावाचे पशुखाद्याच्या दुकाना समोर, ज्योतीबा नगर, काळेवाडी पोलीस चौकी जवळ, काळेवाडी येथे घडला.
फिर्यादी शोएब सईद कुरेशी (वय २३ वर्षे, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी आरोपी सलमान शेख (अंदाजे वय २४ वर्षे, रा. काळेवाडी गावठाण), नरसिंग जाधव (अंदाजे वय २२ वर्षे, रा. चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ६३३/२०२३ भा.द.वि. कलम ३०८, ३४१, ४२७, ५०४, ५०६,३४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ आर्म अॅक्ट ४, २५ व क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.