न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जुलै २०२३) :- बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याचा मोठा डाव पोलीस आणि शेजारील कामगाराच्या सतर्कतेने फसला आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून चोरट्याला पकडण्यासाठी गेलेला पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. शहरातील डांगे चौक या ठिकाणी ही घटना घडली असून फेड बँकेत चोरी करण्याचा हा प्रयत्न फसलेला आहे. एकाला पोलिसांनी पकडलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौकात फेड बँक आहे. याच बँकेच्या शेजारी एका वकिलांचे ऑफिस आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्या दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. मग, लागूनच असलेल्या बँकेच्या भिंतीला ड्रिलने भगदाड पाडण्यास सुरुवात केली.
शेजारी झोपण्यास असलेल्या कामगाराला याचा आवाज आल्याने त्याने त्याच्या मालकाला अज्ञात चोरटे आले असल्याचे सांगितले. मालकाने पोलिसांना याची माहिती दिली. तातडीने घटनास्थळी पोलीस आले, पोलीस आल्याचे कळताच चोरटे त्या ठिकाणाहून पसार झाले. त्यांचा पाठलाग करताना एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. एकाला पकडण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडे वाकड पोलीस कसून चौकशी करत आहेत.