- साडेसातशे कोटी खर्चून करणार साडेसहा हजार घरांची उभारणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२३) :- परवडणाऱ्या दरामध्ये घरे बांधून देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पिंपरी- चिंचवडमधील पेठ क्रमांक १२ येथील फेज १ गृहसंकुलनंतर फेज २ साठी हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकल्पात बांधण्यात येणाऱ्या ४७ इमारतींमध्ये एकूण ६ हजार ४५२ घरांची निर्मिती केली जाणार आहे. सुमारे ७३० कोटी खर्चून पुढील दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ‘पीएमआरडीए’ने ठेवले आहे.
पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी असल्याने कामासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कामगारांचे शहरात मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. लाखो नागरिक गेली कित्येक वर्षे घरमालकांसोबत भाडेकरार करुन राहत आहेत. अशा मध्यमवर्गीय कामगारांना हक्काची घरे बांधून देण्यासाठी ‘पीएमआरडीए’कडून पेठ क्रमांक १२ येथील भूखंडावर फेज १ बांधण्यात आला आहे. त्यामध्ये ४ हजार ८८३ घरे बांधली असून त्यातील ३ हजार १०० घरांच्या तावा पावत्या लाभार्थ्यांना सुपूर्त केल्या आहेत. उर्वरीत घरांचे हस्तांतरण सुरू आहे. आता ‘पीएमआरडीए’ने याच प्रकल्पाला लागून असलेल्या भूखंडावर फेज २ घरांचा प्रकल्प बांधण्याची तयारी केली आहे.
‘पीएमआरडीए’ करणार ६,४५२ घरांची निर्मिती
फेज २ मधील प्रकल्पात ४७ इमारती बांधण्यात येणार आहेत. या इमारतींमध्ये एकूण ६ हजार ४५२ घरे बांधली जाणार आहेत. त्यामध्ये १ बीएचके, १ आरके आणि दोन प्रकारातील २ बीएचके घरे असणार आहेत. आर्थिक दुर्बल घटकासाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही घरे बांधण्यात येत आहेत. या प्रकल्पावर ७३० कोटी रुपये खर्च होणार असून पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे, असा दावा ‘पीएमआरडीए’ने केला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
” पेठ क्रमांक १२ मध्ये फेज २ प्रकल्पाचे कागदोपत्री काम पूर्ण झाले आहे. पुढील आठवड्यात प्रकल्पाचा शुभारंभ केला जाणार आहे. पुढील दोन वर्षाच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. या प्रकल्पात आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकासाठी एकूण ६४५२ घरांची निर्मिती केली जाणार आहे.
प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता
नागरिकांच्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त घरे निर्माण करण्यावर ‘पीएमआरडीए’ चा भर आहे. पेठ क्रमांक १२ मध्ये फेज १ नंतर आता फेज २ गृह प्रकल्प बांधण्यात येणार आहे. फेज १ मधील प्रकल्पात ४८८३ घरे बांधून वाटप केली. आता फेज २ मधील प्रकल्पात ६४५२ घरे नव्याने बांधली जाणार आहेत.
– • राहुल महिवाल, महानगर आयुक्त