- लिपिकावर किरकोळ स्वरुपाची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातील अनेक महत्त्वाच्या फाईली गहाळ झाल्या आहेत. तसेच, कामात केलेला हलगर्जीपणा, सक्त ताकीद देऊनही कामात सुधारणा न झाल्याने लिपिक कुदसिया मुल्ला यांच्यावर आयुक्त शेखर सिंह यांनी कारवाई केली आहे. त्यांना ५०० रूपयांचा दंड ठोठावला आहे.
लिपिक मुल्ला हलगर्जीपणामुळे शिक्षण विभागातील अनेक महत्वाच्या फाईली गहाळ झाल्या आहेत. त्यावरून त्यांना १९ मे २०२२ ला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्याला त्यांनी उत्तर दिले नाही. सक्त ताकीद देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने १२ एप्रिल २०२३ ला पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. गैरहजेरीत कोणीतरी मुद्दाम फाईली गहाळ केल्याचा खुलासा लिपिक मुल्ला यांनी केल आहे.
तो खुलासा वस्तूस्थितीला धरून नाही. फाईली ताब्यात घेतल्यानंतर त्या व्यवस्थित व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी लिपिकाची आहे. त्यामुळे अंतिम संधी म्हणून त्यांना सक्त ताकीद देण्याची शिफारस शिक्षण विभागाचे प्रमुख सहायक आयुक्तांनी केली आहे. त्या आधारे आयुक्त सिंह यांनी लिपिक मुल्ला यांना ५०० रूपयांचा दंड केला आहे. ती रक्कम वेतनातून वसुल केली जाणार आहे. पुन्हा असा हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
दरम्यान, महत्वाच्या फाईली गहाळ झाल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटना व संस्थांनी आयुक्तांकडे केली होती. त्याबाबत अद्याप काहीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.














