- आगामी पालिका निवडणुकीसाठी वेगवेगळी भूमिका असलेले पक्ष एकत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी किती सदस्यांचा प्रभाग असावा, यासाठी तीन पक्षांची वेगवेगळी मते आहेत. पूर्वी भाजप चार सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस दोन व शिवसेना एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी इच्छुक होते. आता सत्तेतील नवीन राजकीय समीकरणात शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किती सदस्यांचा प्रभाग होणार यावर तर्कवितर्क लावले जात आहेत, तीन पक्ष, वेगळी मते आणि तीनच्या प्रभागात जागा वाटपावरून खटके उडण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला फायद्याची होईल, अशी प्रभागरचना केली. त्यावर भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. मात्र, त्यावेळीही किती सदस्यांचे प्रभाग असावेत. यावरून ‘मविआ’मध्ये वेगवेगळी मते होती. राष्ट्रवादी काँग्रेस दोन सदस्यीय पद्धतीसाठी इच्छुक होते. तर शिवसेना व काँग्रेस पक्षाचा बहुसदस्यीय पद्धतीला विरोध होता. अखेर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्य प्रभागरचना केली.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयाच्या कचाट्यात अडकल्यानंतर ओबीसींना वगळून आरक्षण जाहीर करण्यात आले. राज्यात सत्तांतर होताच ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला. त्यानंतर ओबीसींचा समावेश करून नव्याने सोडत काढण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने जुलै २०२३ मध्ये विधिमंडळ बैठकीत निवडणुकीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये २०१७ प्रमाणेच चार सदस्यीय प्रभागरचनेची भूमिका घेतली.
नवीन राजकीय सत्ता समीकरणानंतर भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आले. आगामी पालिका निवडणुकीसाठी वेगवेगळी भूमिका असलेले पक्ष एकत्र आले. त्यामुळे प्रभागरचना नेमकी कोणत्या पक्षाला अनुकूल होणार यावरून स्थानिक पदाधिकारी आखाडे बांधत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी व्यूह रचना सुरु असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.














