- ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२३) :- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर प्राधिकरणाच्या ज्या जागा पीएमआरडीएकडे वर्ग झाल्या आहेत, त्यांचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पेठ क्रमांक १ ते १५ मधील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये छोटया-मोठया स्वरुपातील अतिक्रमणे आढळली आहेत. एकूण ५६ भूखंडांवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यांच्या विरोधात पीएमआरडीएकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
पीएमआरडीए मालकीच्या मोकळ्या जागा आणि रस्त्यांवरअतिक्रमणे करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पीएमआरडीएच्या विभागप्रमुखांची नुकतीच बैठक झाली. पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत अतिक्रमणांविरुद्ध ठोस स्वरुपाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीएमआरडीएच्या भूखंडांवर जी अतिक्रमणे झाली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने गोठे, टपऱ्या, छोटी दुकाने, फॅब्रीकेशनचे दुकान, गॅरेज, गोदामे तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी देखील वापर होत असल्याचे आढळले आहे.
वाकड येथील पीएमआरडीए संपादित क्षेत्रात झालेली अतिक्रमणे यापूर्वी हटविण्यात आली होती. मात्र, या जागी पुन्हा नव्याने ८ झोपड्या उभ्या राहिल्या होत्या. या झोपड्या हटविण्याची कारवाई पीएमआरडीएच्या वतीने शुक्रवारी (दि. ७) करण्यात येणार होती. तशा सूचना संबंधित झोपडीवासियांना दिल्यानंतर त्यांनी स्वतःच या झोपड्या हटविल्या
पीएमआरडीएच्या वतीने पिपरी-चिंचवड परिसरातील ५६ भूखंडांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी बांधकाम निष्कासन विभागातंर्गत भरारी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकांमार्फत सर्वेक्षण करुन अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. पीएमआरडीएच्या वतीने एकदा अतिक्रमणे काढल्यानंतर पुन्हा-पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमणे होत असतील तर, अशा अतिक्रमणांच्या विरोधात फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पीएमआरडीएकडे वर्ग झालेल्या ५६ भूखंडांवर अतिक्रमणे आढळली आहेत. पीएमआरडीएकडून पेठ क्रमांक १ ते १५ येथील परिसराचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. त्यामध्ये छोट्या-मोठ्या स्वरुपात अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले आहे. या अतिक्रमणांच्या विरोधात पुढील आठवड्यात कारवाई केली जाणार आहे.
– रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी, पीएमआरडीए…