- मोठ्या व प्रशस्त रस्त्यांची होणार उभारणी..
- आमदार महेशदादा लांडगे, युवा नेते पांडाभाऊ साने यांच्या पाठपुराव्याला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 1 ऑगस्ट 2023) :- चिखलीतील मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, पाटीलनगर, सोनवणे वस्ती रोड, शेलार वस्ती, रामदासनगर, टॉवर लाईन, साने चौक, चिंचेचा मळा परिसरातील डीपी रस्त्यांचा विकास झालेला नाही. डांबरीकरणाअभावी पावसाळ्यात परिसरातील रस्ता चिखलमय बनला आहे. रस्त्यावर जागोजागी पाणी साचत असुन रस्त्याला खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे अपघाताची शक्यताही बळावली आहे. महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून सारखी येजा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या त्रासातून त्यांची मुक्तता व्हावी यासाठी भाजपचे युवा नेते पांडाभाऊ साने यांनी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता विकसित करण्याकरीता महापालिकेत
वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. आमदार महेशदादा लांडगे यांनीही महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या.
या पाठपुराव्याची दखल घेऊन महापालिकेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी (दि. 30) रस्त्यांची पाहणी केली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, युवा नेते पांडाभाऊ साने, माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता ज्ञानदेव जुधारे, फ क्षेत्रीय कार्यालयाचे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, उप अभियंता विजय वाईकर, कनिष्ठ अभियंता प्रतीक भसारकर आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगीतले. पावसाळा संपल्यानंतर ताबडतोब या डीपी रस्त्याचे काम सुरू करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेले परिसरातील रस्ते प्रशस्त आणी सोयीचे होणार असुन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती युवा नेते पांडाभाऊ साने यांनी दिली.















