न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२३) :- पिंपळे सौदागर येथील काटे पेट्रोल पंप ते गोविंद गार्डन चौक या परिसरातील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेतील तिघांनी मध्यरात्री पार्क केलेल्या नऊ वाहनांची लोखंडी रॉड आणि सिमेंटच्या गट्टूने तोडफोड करीत वाहनांचे नुकसान केले. तसेच एकावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला होता.
रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन दुचाकीवरून आलेल्या तिघा आरोपींनी आरडाओरडा करीत गाड्यांच्या काचा आणि तोडफोड केली होती. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान काही तासातच सांगवी पोलिसांनी अज्ञात आरोपींना निष्पन्न करीत त्यांना अटक केली. रोहिदास तेलंग, प्रवीण म्हस्के, संतोष माळी अशी अटक आरोपींची नावे आहेत. दहशत पसरवणाऱ्या या गुंडांची पिंपळे सौदागर परिसरातून सांगवी पोलिसांनी धिंड काढत त्यांची दहशत मोडीत काढली.














