न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ३ एप्रिल) :- लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ता यांनी आचारसंहितेचा भंग केल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जात आहे. याच अनुषंगाने मावळचे उमेदवार पार्थ पवार यांना पेड न्यूजबाबत खुलासा करण्याबाबत निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.
तसेच रायगड लोकसभा मतदारसंघात विना परवानगी सोशल मीडियावर जाहिरात पोस्ट करून आचारसंहिता भंग केल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनाही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस पाठवली आहे.
मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार ‘पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल विधानसभा क्षेत्र दौरा’ ही बातमी व ‘पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ गाव दौऱ्यांना सुरुवात’ ही एकसारखी बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या दोन्ही बातम्या पेड न्यूजमध्ये मोडत आहेत.
या बातमीचा खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट का करू नये? असा खुलासा उमेदवारास विचारून कार्यवाहीचा अहवाल माध्यम सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीला लवकरात लवकर पाठवावा. याबाबत पार्थ पवार यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.










