- राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची सकारात्मक भूमिका..
- भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या उपस्थितीत बैठक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहराची ओळख ‘कामगारनगरी’ अशी आहे. त्यामुळे १९८५ पासून प्रलंबित असलेल्या कामगार भवनाच्या कामाला चालना देण्यात येईल. मोरवाडी येथे महापालिका प्रशासनाने दिलेल्या सुमारे ५ एकर भूखंडावर भव्य कामगार भवन उभारण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले.
कामगार मंत्री सुरेश खाडे यांची उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ, संभाजीनगर येथे संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, केशव घोळावे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, भोसरी विधानसभा निवडणूक प्रमुख विकास डोळस, चिंचवड विधानसभेचे प्रमुख काळूराम बारणे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, युवा मोर्चा सचिव तेजस्विनी कदम, माजी नगरसेवक उत्तमराव केंदळे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, सरचिटणीस राजू दुर्गे, कामगार कल्याण मंडळाच्या माजी संचालिका भारती चव्हाण आदी उपस्थित होते.
शहरातील कामगार नाके (मजुर अड्डे) आहेत. त्या ठिकाणी निवारा शेड, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, नाश्ता, मध्यान्ह भोजन, वाचनालय, शौचालय व बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. नाक्यावरील कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी कामगार भवन, मोरवाडी येथे कौशल्य विकास केंद्र उभारले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड ही सर्वात मोठी औद्योगिक नागरी असल्याने या ठिकाणी जास्तीत-जास्त कामगार निधी उपलब्ध करण्याचे धोरण राज्य सरकार अवलंबणार आहे. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पदाधिकारी व कामगार प्रतिनिधींच्या माध्यमातून शिष्टमंडळ तयार करण्यात येईल. मुंबई, मंत्रालय येथे कामगार मंत्र्यासोबत आगामी १० दिवसांत बैठक घेवून शहरातील सर्व प्रकारच्या कामगारांच्या प्रश्नावर समस्यांवर आर्थिक तरतुदी व उपाय योजना करण्यात येतील, असे आश्वासनही कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले आहे.
कामगार भवनसाठी ३८ कोटींचा निधी…
यावेळी संभाजीनगर केंद्र येथील इमारतीला दिव्यांग कामगारांसाठी उदवाहन बसवण्याबाबत कामगार मंत्र्यांनी आदेश दिला. तसेच, तेथील इतर समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. प्रस्तावित कामगार भवनामध्ये कामगार कला केंद्र, क्रीडा अकादमी, अभ्यासिका, कामागारांशी संबधित सर्व विभाग, कामगारांच्या संघटीत, असंघटित, सेवा निवृत्त या सर्व प्रकारातील कामागारांच्या सर्व योजना त्या ठिकाणावरून कार्यानिवीत करण्यासाठी पाच एकर भूखंडामध्ये कामगार भवन उभारण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात ३८ कोटी रुपयांचा निधी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मंजूर केला आहे.
मल्टिस्पेशालिटी ईएसआय हॉस्पिटल…
मोहननगर येथील ईएसआय हॉस्पिटल येथे ३५० कोटी रुपयांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सुसज्ज कार्डियाक ॲम्बुलन्स, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वसाहत मंजूर केली आहे. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मेंदू, हृदय किडनी उपचार सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचा नकाशा आराखडा महिनाभरात मंजूर करून लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन करून जलद गतीने काम पूर्ण केले जाणार आहे, असेही कामगार मंत्र्यांनी सांगितले.
कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. घरेलू कामगार, विक्रीकर कर्मचारी यांच्यासाठी महामंडळाची निर्मिती करून, त्यामध्ये निधी उपलब्ध त्यांच्या परिवारासाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातील, असे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले आहे. याबद्दल मी पिंपरी-चिंचवडमधील कामगारांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड…












