न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२३) :- पवनानगर येथे नागरी वस्तीतील गायींच्या गोठ्यात नऊ फूट लांबीचा अजस्र अजगर सापडला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी या अजगराला सुरक्षितरित्या रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
पवनानगर येथील काशिनाथ डोंगरे, संतोष घरदाळे, शिवाजी राजीवडे व त्यांचे सहकारी गाईच्या खाद्यासाठी गवत कापत असताना गोठ्याजवळ एक भला मोठा साप असल्याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य शत्रुघ्न रासनकर व रमेश कुंभार यांना फोनवरून दिली. त्यानुसार तात्काळ संस्थेचे सदस्य शत्रुघ्न रासनकर व रमेश कुंभार हे त्या ठिकाणी पोहोचले व साप कुठे आहे याची पाहणी करत असता त्यांना त्या ठिकाणी साधारण ९ ते १० फूट अजगर असल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी लगेच संस्थेचे संस्थापक नीलेश गराडे व अध्यक्ष अनिल आंद्रे यांना याची माहिती दिली. त्यानंतर जवळच गायींचा गोठा असल्यामुळे त्या अजगरास पकडुन परत नैसर्गिक अधिवासात सोडून देण्याचे ठरले. तसे वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना कळविले. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली या अजगराला कुठलीही इजा न करता सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
नीलेश गराडे, अनिल आंद्रे, प्रमोद ओव्हाळ, शत्रुघ्न रासनकर, रमेश कुमार, संतोष दहीभाते, सोमनाथ चौधरी, उमेश साळवे, विनोद मोरे, नागेश कदम, नयन कदम, सूरज शिंदे, रोहन ओव्हाळ यांनी परिश्रम घेतले.












