- चालू आर्थिक वर्षात दोन्ही शहरातून तब्बल तीन हजार कोटींचा महसूल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२३) :- चालू आर्थिक वर्षात केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधून तब्बल तीन हजार कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांच्या घेतलेल्या आढाव्यात ही बाब समोर आली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडकरांचा मालमत्ता खरेदी-विक्रीकडे कल असल्याचे दिसून आले आहे.
पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, दोन वर्तुळाकार रस्ते अशा महत्वाकांक्षी प्रकल्पांसह माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र, उद्योग, रोजगाराची हमी अशा विविध घटकांमुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ता खरेदी-विक्रीत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नोंदविले आहे.
चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल ते आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल एक लाख सहा हजारांपेक्षा जास्त दस्त नोंद झाले आहेत. त्यातून तीन हजार कोटींचा महसूल मिळाला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत ६९ हजार ५८९ दस्त नोंद झाले. त्यातून शासनाला १ हजार ५७०.४९ कोटींचा महसूल प्राप्त झाला. जुलै महिन्यात २५ हजार २२९ दस्त नोंद होऊन ८७३.२६ कोटींचा महसूल मिळाला, तर ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त दस्त नोंद होऊन सुमारे ५५० कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
चालू आर्थिक वर्षात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसाठी राज्य शासनाने ८ हजार ५०० कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले आहे. या उद्दिष्टापैकी निम्मे उद्दिष्ट पहिल्या पाच महिन्यांतच पूर्ण करण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला यश आले आहे.












