- मावळवासीयांनी पवनेच्या दुर्गतीसाठी पिंपरी चिंचवड शहराला धरले जबाबदार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. ०१ सप्टेंबर २०२३) :- मावळ तालुक्यातील जीवनदायिनी असलेली पवना नदी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत गेल्यानंतर मैलावाहिनी होते, त्याला सर्वस्वी महापालिकाच जबाबदार आहे. त्यामुळे पवना बंदिस्त जलवाहिनीला आमचा विरोध असून, हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर भेगडे यांनी केली आहे.
पवना धरणापासून पवना नदी पवन मावळ मार्गे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत जाते मावळ तालुक्यातून ही नदी अतिशय स्वच्छ वाहते. त्यामुळे तिला पवन मावळची जीवनदायिनी म्हटले जाते. मात्र, ही नदी महापालिका हद्दीत गेल्यानंतर प्रदूषित होत असून तिला मैलावाहिनी असे म्हणावे लागते. नदीच्या पाण्यावर तालुक्यातील अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना तसेच हजारो एकर शेती, शेतीपूरक व्यवसाय, पर्यटन अवलंबून आहे. नदी बंद होऊन बंद जलवाहिनी झाली तर त्याचे दुष्परिणाम मावळ तालुक्याला भोगावे लागतील. महापालिका रावेत येथील बंधाऱ्यातून दररोज सुमारे ५५० एमएलडी पाणी उचलते. यापैकी ४० टक्के म्हणजे २०० ते २२० एमएलडी पाण्याची चोरी होते. या चोरीवर लक्ष केंद्रित केले तरी महापालिका तेथील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करू शकते. पिंपरी-चिंचवडमधील कारभाऱ्यांनी शास्तीकर माफ करून अनधिकृत बांधकामांना अभय दिल्याने भविष्यातही बांधकामांची व पर्यायाने लोकसंख्येची वाढ होत राहणार आहे. त्यामुळे पाणी कितीही असले तरी कमीच पडणार आहे. वास्तविक महापालिकेने पाणी शुद्धीकरणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पवन मावळातील शेतकऱ्यांना पाणी वाचविण्यासाठी ठिबक सिंचनासाठी अनुदान देऊन प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. मावळ व मुळशी तालुक्यातील टाटा कंपनीची धरणे राज्य सरकारने ताब्यात घेऊन त्यांच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला अन्य पर्याय देऊन त्या धरणांतून जलवाहिनीने पाणी न्यावे असेही भेगडे यांनी सुचवले आहे. पवना धरणातून वाहणारी पवना नदी मावळातून आजही चांगल्या पद्धतीने वाहते आहे, पण, पुढे मात्र खराब झाली आहे. याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा अन्यथा २०११ पेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही भेगडे यांनी या निवेदनातून दिला आहे.
या संदर्भात किशोर भेगडे यांच्यासह नितीन बोडके, नंदकुमार गराडे, अर्जुन गराडे, दिलीप राक्षे, राकेश घारे, अविनाश गराडे, बबलू कालेकर, गणेश सावंत, संजय शेडगे, अतुल राऊत, स्वप्नील घारे, गणेश कालेकर, ज्ञानेश्वर तिखे, विजय निंबळे, दिनेश ठोंबरे, अशोक सातकर आदींनी तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले.













