- वर्षाला दोन लाख वाहनं उत्पादनाचे कंपनीचे उद्दिष्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२३) :- ह्युंदाईपाठोपाठ महिंद्रा अँड महिंदा कंपनी चाकणमध्ये इलेक्ट्रिक मोटारीचा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पात दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, वर्षाला दोन लाख मोटार उत्पादनाचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष विजय नाकरा यांनी दिली.
पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण आणि तळेगाव परिसरात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्या आहेत. ह्युंदाईने जनरल मोटार कंपनीचा प्रकल्प विकत घेतला आहे. येता काळ इलेक्ट्रिक वाहनांचा असणार आहे. ह्युंदाई कंपनी इतर प्रकारच्या वाहनांबरोबरच इलेक्ट्रिक मोटारींचे उत्पादन तळेगावातील प्रकल्पातून करणार आहे. महिंद्रादेखील इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार असून, २०३० पर्यंत उत्पादनक्षमतेच्या तीस टक्के वाहने इलेक्ट्रिक असणार आहेत. या प्रकल्पातून २०२७ ते २०२९ या काळात वार्षिक दोन लाख मोटारींचे उत्पादन करण्यात येईल. या वर्षी जानेवारी महिन्यात महिंद्रा कंपनीच्या चाकण येथील प्रस्तावित प्रकल्पास मान्यता मिळाली होती.
कंपनी चाकण प्रकल्पात दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. येत्या सात ते आठ वर्षांत टप्प्याटप्प्याने ही गुंतवणूक केली जाणार आहे. उत्पादन आणि नवीन मॉडेलचा विकास करण्याची सुविधा येथे उभारली जाईल. याशिवाय कंपनीचे नवीन बॉर्न इलेक्ट्रिक (बीई) या मॉडेलचे उत्पादनही याच प्रकल्पातून केले जाणार आहे. चाकण प्रकल्पातून हे नवीन मॉडेल पुढील वर्षाच्या अखेरीस येईल. चाकण प्रकल्प येत्या चार ते पाच महिन्यांत कार्यान्वित होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. महिंद्रा कंपनी तीनचाकी इलेक्ट्रिक कंपनीमध्ये अग्रस्थानी आहे. या श्रेणीतील सत्तर टक्के वाहने महिंद्राची आहेत.