- भाजपचा सातबारा बाहेर काढण्यासाठी राज्यात दहा सभा घेणार
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ६ एप्रिल) :- मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलेच तोंडसुख घेतले. मोदी फेकू पंतप्रधान आहेत. इंटरनेटवर फेकू शब्द टाईप केला असता मोदींच्या नावाचा उल्लेख येतो. पंतप्रधान मोदी खोटारडे आहेत. पंतप्रधान झाल्यावर मोदी बदलले. कालचे मोदी व पंतप्रधान मोदी यांच्यात फरक आहे. तसेच भाजपचा सातबारा बाहेर काढण्यासाठी राज्यात दहा सभा घेणार असल्याचे यावेळी राज ठाकरे म्हणाले.
आडवाणी यांनी पक्ष सत्तेपर्यंत आणला परंतु, त्यांना मोदींनी पंतप्रधान केले नाही. ५ वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मोदींना पत्रकारांची भीती वाटते. १५ लाख ही थापच आहे. मोदींनी स्वतःच्या आईचेसुद्धा भावनिक राजकारण केले. भाजपने कॉंग्रेसच्या जुन्या योजनांची नावे बदलून २०१२ सालच्या बेसिक सेव्हिंग योजनेचे प्रधानमंत्री जनधन योजना, इंदिरा आवास योजनेचे प्रधानमंत्री आवास योजना, बेटी बचाव योजना अशा बहुतांशी योजनांचे भाजपने नामांतर केले.
नामांतरावरून कॉग्रेसवरतीही राज यांनी खरडपट्टी केली. देशातील उल्लेखनीय काम केलेल्या लोकांची नावे या योजनांना का देत नाहीत? असा सवालही त्यांनी यावेळी केला. मोदींनी नोटाबंदीच्या वेळी स्वतःच्या आईला रांगेत उभे केले. मोदींना पाच वर्षात बरेच काम करता आले असते. परंतु, त्यांनी केले नाही. आधारकार्ड वरूनही मोदींन त्यांनी फैलावर घेतले. भाजपने आधारकार्डला आधी विरोध नंतर समर्थन का केले? नमामि गंगे उपक्रमाचे २० हजार कोटी गेले कुठे? मोदींच्या वाराणसी मतदारसंघात गंगा नदी स्वच्छ नाही. नोटाबंदीबाबत स्वतःच्या मंत्रिमंडळालासुद्धा मोदींनी कल्पना दिली नव्हती.
अडोल्फ हिटलर प्रमाणे मोदींचा कारभार सुरु आहे. पुलवामा हल्ला हा भाजपच्या नियोजनातून झाला आहे. त्यासाठी आरडीएक्स आले कुठून? असा सवाल राज यांनी केला. ४० जवानांच्या हत्येस मोदीच जबाबदार आहेत. या हल्ल्याचे मोदींनी राजकारण केले आहे. मुफ्ती मेहबूबासोबत सत्ता स्थापन करून मोदींना कोणता धर्म पाळला. सर्जिकल स्ट्राईकच्या आकडेवारीवरूनही त्यांनी अमित शहांचा बुरखा फाडला. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले, तर देशद्रोही ठरवतात. तसेच ”अच्छे दिन आयेंगे” ही घोषणाही भाजपची नाही. ती १९४४ साली अमेरिकास्थित रूझवेल्टची आहे.
मेक ईन इंडिया, स्टार्ट अप, नोटाबंदीवरही मोदी बोलायला तयार नाहीत. मुद्रा योजना फसवी आहे. नोटाबंदीमुळे साडेचार कोटी युवक बेरोजगार झाले आहेत. नोटाबंदी आधीच भाजप नेत्यांनी आपला काळा पैसा जमिनीत गुंतवला असल्याचे राज ठाकरे म्हणाले. डिजिटल योजनेचाही फज्जा उडला आहे. देशातील बहुतांशी नागरिकांकडे बँकेचे एटीएम कार्डसुद्धा नाही. मोदी परत निवडून आले तर निवडणुका बंद होतील. भाजपकडून निवडणुकामध्ये पैसे वाटत आहेत. पर्यायच हवा असेल तर राहुल गांधी काय वाईट आहेत. मोदी व शहा यांना पून्हा निवडून देवू नका, असे आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी केले.










