- पालकांना आपल्या मुलांमधील ‘टॅलेंट’ ओळखता आले – डॉ. कुंदाताई भिसे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२३) :- ‘नन्हां मुन्ना राही हूँ’, ‘लहान माझी बाहुली’, ‘नानी तेरे मोरनी को’ अशा दिलखुलास बच्चे कंपनीच्या बालगीतांनी उपस्थितांची वाहवा मिळविली. गणपती बाप्पा उत्सवानिमित्त पिंपळे सौदागर येथील मुलांसाठी रविवारी (दि. १०) रोजी ‘टॅलेंट हंट’ गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने सायंकाळी जरवरी सोसायटीत गीत गायनाची स्पर्धा भरविण्यात आली होती. ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेतील १० भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसं देण्यात आली. तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तीपत्रक आणि पारितोषिक प्रदान करण्यात आले. दोनशेपेक्षा अधिक स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला. या गायन स्पर्धेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लहान मुलांच्या लोभस आवाजाने पालक आणि उपस्थित वर्ग हरखून गेला होता.
यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे, उद्योजक संजय भिसे, रमेश वाणी, सोनम चांडक, रविंद्र पाटील, लहान मुलांचे पालक आणि परिसरातील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, बरेचदा लहान मुलांना त्यांच्या बालपणात त्यांना नक्की काय व्हायचे असते, हे कळत नाही. त्यामुळे पालकांना देखील मुलाचा कल कशाकडे आहे हे उमगत नाही. त्यामुळे पालक आणि मुलं यांच्यात विचारांची घुसमट सुरु होते. या गोष्टीची गरज ओळखून लहान मुलांसाठी ‘टॅलेंट हंट’ या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी सुंदर आणि आशयप्रधान गीतांवर गीत गायन केले. त्यामुळे पालकांना देखील मुलांमधील ‘टॅलेंट’ ओळखता आले. स्पर्धेची संकल्पनाच इतकी नाविन्यपूर्ण होती की स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी तर आभार उद्योजक संजय भिसे यांनी मानले.