न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२३) :- देहू येथील रयत शिक्षण संस्थेचे संत तुकाराम विद्यालय, कै. शंकरराव मोरे ज्यूनिअर कॉलेज, संत जिजाबाई कन्या विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रयत संकुल येथे शिक्षण महर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, माजी सरपंच रत्नमाला करंडे, विद्यालयाचे प्राचार्य बालाजी पुजारी, उपमुख्याध्यापिका विद्या कांबळे, मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर, विद्यालयाच्या इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी चौरे, नारायण मोरे यांनी कर्मवीरांच्या पुतळ्याचे व रथाचे पूजन केले. विद्यालयाचे शिक्षक वृंद कर्मचारी आजी-माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
मिरवणुकी दरम्यान लेझीम, झांज पथके व ढोल-ताशांच्या गजरात मिरणूक काढण्यात आली. वारकरी वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’, ‘कर्मवीर अण्णा अमर रहे’ अशा जोरदार घोषणा दिल्या. देहू परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.