- गुरुवार ऐवजी या दिवशी मिळणार सुट्टी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२३) :- महाराष्ट्र शासनाने २०२३ करीता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्टयांमधील ‘ईद-ए-मिलाद’ या सणाची सार्वजनिक सुट्टी गुरुवार, दि. २८.०९.२०२३ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठया प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
तथापि यावर्षी गुरुवार दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी हिंदु धर्मियांचा अनंत चतुर्दशी हा सण आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मुर्तीची मोठी मिरवणूक काढण्यात येते व नंतर तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने हिंदु बांधवांची मोठी गर्दी जमा होत असते. यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी ही गुरुवार, दि. २८ सप्टेंबर २०२३ ऐवजी शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे.
सार्वजनिक सुट्टयांमधील ईद-ए-मिलाद या सणाची सार्वजनिक सुट्टी गुरुवार, दि. २८.०९.२०२३ रोजीची सार्वजनिक सुट्टी रद्द करुन त्याऐवजी शुक्रवार, दि. २९.०९.२०२३ रोजी सार्वजनिक सुट्टी महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली आहे. दि. २८.०९.२०२३ रोजी शासकीय कार्यालय सुरु राहतील, अशी माहिती शासनाने दिली आहे.













