- अन्यथा ग्रामस्थांच्या घरी येतील कोर्टाच्या नोटीसा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. ०५ ऑक्टोबर २०२३) :- इंदोरी ग्रामपंचायतीची चालू वर्षातील एक कोटी ५४ लाख आणि मागील थकबाकीसह सुमारे दोन कोटी ७० लाखांची थकबाकी आहे. केवळ सरासरी २२.५ टक्केच करवसुली झाल्याने ग्रामपंचायतीपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
गतवर्षी वीजबिल न भरल्याने ‘महावितरण’ने वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे सुमारे तीन आठवडे गाव व वाड्या-वस्त्यांवरील पथदिवे बंद होते. सध्या विद्युत मोटारींद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे वीजबिल सुमारे ९२ लाख रुपये तर पथदिव्यांचे वीजबिल सुमारे ६५ लाख रुपये थकीत आहेत. हे दोन्ही वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी यांनी सांगितले.
करवसुलीसाठी ग्रामपंचायतीकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. घंटागाडीच्या माध्यमातून ध्वनीक्षेपकाद्वारे दररोज कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. करवसुली पथक तसेच सरपंच व सदस्य थकबाकीदारांशी संपर्क साधत आहेत. तरीही थकीत मिळकतदार दखल घेत नाहीत. त्यासाठी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत थकबाकीदारांचे नळजोड तोडण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला आहे. दहा हजार रक्कमेपुढील जे थकबाकीदार आहेत, त्यांना न्यायालयांकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
एकूण थकीत पाणीपट्टी सुमारे ४० लाख ५७ हजार रुपये आहे. पाणीपट्टीतून सार्वजनिक पाणीपुरवठा वीजबिल अदा केले जाते. ते थकीत वीजबिल सुमारे ९२ लाख रुपये आहे. पथदिव्यांचे थकीत वीजबिल सुमारे ६५ लाख रुपये आहे. ते ग्रामनिधीतून अदा केले जाते. एकंदरीत सुमारे दोन कोटी नऊ लाख ६५ हजार रुपये (७७.५० टक्के) थकीत करवसुली होणे बाकी आहे. पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी व पाणीपुरवठा नियमित चालू राहण्यासाठी मिळकतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच शशिकांत शिंदे व सदस्यांनी केले आहे.













