- शहराध्यक्षांसह पदाधिकारी व माजी नगरसेवकांचा पालिकेकडे ओढा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२३) :- एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील होत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. तर आता पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही मिळालं. त्यामुळे पुन्हा सत्तेत आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट महापालिकेत सक्रिय झाला आहे. शहराध्यक्षांसह पदाधिकारी व माजी नगरसेवकांचा महापालिकेत राबता वाढला आहे.
महाविकास आघाडीत अजित पवार मुख्यमंत्री होते. त्या काळात राष्ट्रवादी महापालिकेत अॅक्शन मोडमध्ये होता. मात्र, सत्तांतर होऊन शिंदे यांचे सरकार राज्यात आल्याने राष्ट्रवादीचा उत्साह मावळला होता. पालिकेतील अनेक कामांत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने आंदोलन उभारले होते.
शहराला भेट देत उपमुख्यमंत्री पवार यांनी महापालिकेत २५ ऑगस्टला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या समवेत आढावा बैठक घेतली. तसेच, कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. आयुक्त शेखर सिंह यांनाही त्यावेळी अजित पवार यांनी काही कानमंत्र दिले होते. त्यामुळे महापालिकेत पक्षाचे शहराध्यक्ष, पदाधिकारी व माजी नगरसेवकांच्या चकरा वाढल्या आहेत. आपल्या प्रभागातील रखडलेली कामे करून घेण्यात ते आग्रही दिसत आहेत. पालिकेत न फिरकणारेही आता पालिका भवनात अधिकाऱ्यांच्या दालनात दिसत आहेत. दरम्यान, महापालिकेचे काही अधिकारीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेत लक्ष घातल्याने खासगीत समाधान व्यक्त करीत आहेत. पवार यांच्या कामाचे नियोजन व अनुभव पालिकेच्या बऱ्याच अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे ते आता रखडलेली कामे व प्रकल्प वेगात मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त करीत आहेत.













