न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ८ हजार ७२२ नवमतदारांची भर पडली आहे. त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. तर, भोसरी मतदारसंघात ६ हजार ११२ आणि पिंपरी मतदारसंघात ३ हजार ४७८ नवमतदार झाले आहेत. शहरात म्हणजे या तीन मतदारसंघात एकूण १८ हजार ३१२ मतदार वाढले आहेत. तर, मयत व दुबार असलेले एकूण २ हजार ३०१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार पुनर्निरीक्षणाच्या कार्यक्रमातंर्गत गेल्या ९ महिन्यात २१ मतदारसंघात एक लाख ६० हजार मतदारांचे बदल अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. त्यामुळे वाढीव मतदारांचा कौल कोणत्या पक्षाला मिळणार याबाबत राजकीय तर्कवितर्क सुरु आहेत.
मतदार अद्ययावत करण्यासाठी मतदारांच्या दुरस्ती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येत आहे. नव्या वर्षात ५ जानेवारीला अद्ययावत मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
या मोहिमेत राज्यात क्रमांक दोनचा सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ८ हजार ७२२ नवमतदारांची नोंद झाली आहे. त्यांना येत्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तर १ हजार २७ मतदारांची दुबार व मयत नावे वगळण्यात आली आहेत.
त्या पाठोपाठ भोसरी मतदारसंघात ६ हजार ११२ नवीन मतदार झाले आहेत. एकूण ८७८ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तर, ५ हजार २८१ जणांच्या नावात दुरुस्ती करण्यात आली. एकूण १२ हजार २७१ अर्ज करण्यात आले होते. तर, पिंपरी मतदारसंघात ३ हजार ४७८ जणांनी नोंदणी केली आहे. एकूण ३९६ जणांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. तीन हजार १ मतदारांच्या नावात दुरुस्ती करण्यात आली. या मतदार संघातून एकूण ६ हजार ८७५ अर्ज प्राप्त झाले आहेत.













