- मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे मागणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२३) :- ओपन जिम उपकरणांची देखभाल दुरूस्ती विषयक कामे नियमितपणे करा, अशी मागणी मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आज बुधवारी (दि. ११) रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे यांना लेखी निवेदन दिले असून, प्रभागातील सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात आलेल्या ओपन जीमच्या देखभाल दुरूस्तीच्या अभावाने झालेल्या दुरावस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक २८ मध्ये कोकणे चौक ते स्वराज गार्डन चौक दरम्यान शहराच्या वैभवात भर घालणारे लिनियर अर्बन गार्डन विकसित करण्यात आले आहे. या गार्डनमध्ये नागरिकांच्या करमणूक, मनोरंजन या सोबतच आरोग्य विषयक सुविधा म्हणून नागरिकांना व्यायाम करण्यासाठी आमदार निधीच्या सहायता निधीमधून ओपन जिम उपकरणे बसविण्यात आले आहेत. परंतु, गार्डनमध्ये बसविण्यात आलेले बऱ्याच ओपन जिम उपकरणाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून बरेचशे उपकरणे मोडकळीस आलेले आहेत. काही पुर्णपणे तुटलेले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना या ओपन जिमचा वापर करणे धोकादायक तसेच असुरक्षित वाटत आहे. अश्या तुटलेल्या किंवा बिकट अवस्थेत असलेल्या ओपन जिममध्ये व्यायाम करताना नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या मानसिक आरोग्याप्रमाणेच शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेली ओपन जिमची संकल्पना या मोडकळलेल्या जिम उपकरणांमुळे साध्य होताना दिसत नाही. पिंपळे सौदागर परिसरातील लिनियर अर्बन गार्डनमध्ये बसविण्यात आलेल्या ओपन जिम उपकरणांची देखभाल दुरूस्ती विषयक कामे नियमितपणे करण्यात यावेत. तसेच तुटलेली उपकरणे लवकरात लवकर दुरुस्त करावेत, असे या निवेदनात शत्रुघ्न काटे यांनी म्हटले आहे.