न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२३) :- नवरात्रौत्सवात कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने, भाविकांची व पर्यायाने वाहनांची मोठी गर्दी होते.
त्यामुळे यात्रा कालावधीत कार्ला फाटा ते वेहेरगाव या रस्त्यावर आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन या दोन्ही मार्गावर जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांच्याकडून जारी करण्यात आली आहे.
१५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान कार्ला फाटा ते एकवीरा देवी पायथा मंदिर दरम्यान पूर्ण वेळ अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश बंद राहील. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर लोणावळा-कुसगाव बुद्रुक टोलनाका वडगांव फाटामार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड़ अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन ती खंडाळा कुसगांव टोलनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरुन पुणे बाजूकडे जातील.
याच कालावधीत जुना पुणे-मुंबई महामार्गावरून वडगाव तळेगाव फाटा- लोणावळा, मुंबई बाजूकडे जाणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन ती तळेगाव फाटा येथून उसे खिंड, उसे टोलनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरुन मुंबई बाजूकडे जातील.













