न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२३) :- मुंबई – बंगळुरू महामार्गावर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकला आग लागून दुर्दैवाने यात चौघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. यात लहान मुलाचाही समावेश आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.
हा अपघात नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. मक्याचा भुसा घेऊन साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ आला असता, ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली.
यात कंटेनर रस्त्यावरच उलटला. मात्र धडक मोठी बसल्याने ट्रकला क्षणातच आग लागली. यात ट्रकच्या केबिनमध्ये बसलेल्या चार जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून मृतदेह बाहेर काढले.