- बांधकाम व्यावसायिकांशी केलेल्या करारातील अटी व शर्ती बारकाईने वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२३) :- घर घेताना किंवा घेतल्यानंतर सावध रहा. बांधकाम व्यावसायिकांशी केल्या जाणाऱ्या करारातील अटी व शर्ती बारकाईने वाचा. काही शंका असतील, तर त्वरित त्यांचे निरसन करून घ्या. नंतर फसवणूक झाली, अमुक अटीबाबत आम्हाला माहितीच नव्हतं. ही सुविधा द्यायला पाहिजे होती, सोसायटीचे पदाधिकारी काहीच करत नाहीत, असे वाद निर्माण होतात. ते टाळण्यासाठी सर्व माहिती घ्या, सावध रहा आणि संभाव्य फसवणूक वाद टाळा,’’ असे आवाहन ॲड. अजित बोऱ्हाडे यांनी केले.
चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनतर्फे रविवारी (दि. १५) महापालिकेच्या पूर्णानगर येथील बहुउद्देशीय सभागृहात सहविचार सभा झाली. त्यात फेडरेशनचे कायदा सल्लागार म्हणून ॲड. बोऱ्हाडे बोलत होते. गृहनिर्माण सोसायट्यांच्या अडचणी आणि समस्या सोडविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, प्रा. प्रताप बामणे, ज्येष्ठ सदस्य अविनाश आंबेकर यांच्यासह चिखली, मोशी, चऱ्होली भागातील सोसायट्यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सांगळे यांनी फेडरेशनच्या कार्याचा आढावा घेऊन भविष्यातील नियोजन सांगितले. ते म्हणाले, ‘‘शहरातील गृहनिर्माण सोसायटीधारकांना दैनंदिन विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या पातळीवर हे काही प्रश्न रखडले जात आहेत. त्याला सकारात्मक गती दिली जात नाही. यावर विचारविनिमय करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आदर्श उपविधीनुसार सोसायटी चालवायला हवी. बांधकाम व्यावसायिकांकडून सोसायटी हस्तांतरण करून घ्यायला हवी. त्यासाठी फेडरेशन नेहमीच तुमच्यासोबत आहे.’’
सोसायटी बिल्डरकडून हस्तांतरण करून घेताना घ्यावयाची विविध कागदपत्रे, येणाऱ्या अडचणी, बिल्डरकडून सोसायटीची अपूर्ण कामे पूर्ण करून घेणे, बिल्डरकडून होणारा त्रास, मार्गदर्शन आणि मदत करणे. सोसायटीची निवडणूक प्रक्रिया, सोसायटीचा देखभाल खर्च, तो वसूल करणे, अभीहस्तांतरण (कन्व्हेन्स डीड) आणि मानीव अभीहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेन्स), थकीत मेंटेनन्स वसुली या संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली बैठकीत देण्यात आली.
घर घेताना बिल्डरकडून फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्या. फ्लॅट बुकिंग करतानाच आपण वेगवेगळी रक्कम भरतो. पार्किंग शुल्क, सुरक्षा शुल्क, मेंटन्स शुल्क, बुकिंगची रक्कम याची नोंद ठेवा. करारनामा बारकाईने वाचा. पार्किंग धोरणाबाबत माहिती करून घ्या. पार्किंगसाठी किती जागा सोडली आहे, त्यानुसार इमारत बांधली आहे का? अभिहस्तांतरण किंवा मानवी हस्तांतरण करून घ्या. त्याबाबतचे पत्र बिल्डरकडून घ्या, म्हणजे वाद निर्माण होत नाहीत.
– ॲड अजित बोऱ्हाडे, कायदा सल्लागार, सोसायटी फेडरेशन…