न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२३) :- इंधन वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने सहप्रवासी जुळ्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना विश्रांतवाडी चौकात सोमवारी घडली. अपघातात मुलींची आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी टँकरचालकाला रात्री अटक करण्यात आली.
दुपारी साडेचारच्या सुमारास दुचाकीस्वार सतीशकुमार, त्यांची पत्नी किरण, जुळ्या मुली साक्षी आणि श्रद्धा निघाले होते. विश्रांतवाडी चौकातून ते आळंदीकडे निघाले होते.
विश्रांतवाडी चौकातील सिग्नल ते थांबले होते. सिग्नल सुरू झाल्यानंतर पाठीमागून भरधाव निघालेल्या टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. दुचाकीस्वार सतीशकुमार फेकले गेल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. पत्नी किरण आणि दोन मुली टँकरच्या चाकाखाली सापडल्या. गंभीर जखमी झालेल्या तिघींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघींचा मृत्यू झाला होता.
प्रत्यक्षदर्शींना अश्रृ अनावर विश्रांतवाडी चौकात सिग्नल सुटल्यानंतर टँकरने दुचाकीला धडक दिली. साडेतीन वर्षांच्या जुळ्या मुली आणि त्यांची आई टँकरच्या चाकाखाली सापडल्या. जुळ्या मुलींचा मृत्यू झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शींना अश्रृ अनावर झाले. नागरिकांनी टँकरचालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी घटनास्थळी भेट दिली.