- आमदार सुनील शेळके यांचा पाठपुरावा; मुख्यमंत्री सकारात्मक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२३) :- मावळ तालुक्यातील जनरल मोटर्स कामगारांच्या गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत कामगारांना जनरल मोटर्स कंपनीने अधिकचे पॅकेज द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कामगारांना हे मान्य नसेल तर ह्युंदाई कंपनीला सरकारच्या माध्यमातून काहीशी सवलत देऊन त्या कंपनीने संबंधित कामगारांना कामाला घेण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडली.
२ ऑक्टोबरपासून जनरल मोटर्स कामगारांचे कुटुंबासह बेमुदत साखळी उपोषण सुरू असून आमदार सुनील शेळके यांनी पहिल्याच दिवशी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन १० तारखेपर्यंत राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास एमआयडीसो बंद करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आमदार शेळके यांनी युनियन प्रतिनिधी संदीप भेगडे यांच्यासह १० ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता त्यांनी दुसऱ्याच दिवशी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार ११ ऑक्टोबर रोजी उद्योगमंत्री सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले. मंगळवारी ही बैठक पार पडली. मुख्यमंत्री शिंदे, उद्योगमंत्री सामंत, कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, युनियन अध्यक्ष संदीप भेगडे व युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.
जनरल मोटर्सच्या प्रकल्पातील १ हजार ५७८ कामगारांपैकी सुमारे ६९६ कामगारांनी भरपाईची रक्कम स्वीकारून स्वेच्छेने काम सोडल्याची माहिती या वेळी देण्यात आली. उर्वरित कामगारांची वाढीव भरपाई तर काहींची हुयदाईने सेवेत घ्यावी, अशी मागणी आहे. त्यावर उर्वरित कामगारांच्या वाढीव भरपाईच्या मागणीबाबत जनरल मोटर्सच्या व्यवस्थापनाने फेरविचार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
ह्युंदाई आपला प्रकल्प २०२५ मध्ये सुरू करणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी शासन म्हणून त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. हा प्रकल्पदेखील मोठ्या रोजगार संधी उपलब्ध करून देणारा आहे. त्यामुळे भरपाई मान्य नसलेल्या आणि कुशल, अर्धकुशल अशा कामगारांना प्राधान्याने सेवेत घ्यावे यासाठी आवश्यक असा पाठपुरावा केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारच्या वतीने मांडलेली भूमिका सांगण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत हे गुरुवारी (दि. १९) वडगाव मावळ येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देणार असून सरकारची भूमिका मांडून आंदोलन थांबविण्याची विनंती करणार आहेत.













