- पिंपरी चिंचवड शहरातील आशा स्वयंसेविकांचाही काम बंद ठेवून आंदोलनात सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑक्टोबर २०२३) :- आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वार्षिक वेतनवाढ पाच टक्के व अनुभव बोनस पंधरा टक्के गटप्रवर्तकांनासुद्धा लागू करण्यात यावा. त्याखेरीज गटप्रवर्तकांना प्रवास भत्ता देण्यात यावा, यांसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने बुधवारी जिल्हा परिषदेवर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पिंपरी चिंचवड शहरातील आशा स्वयंसेविका देखील सहभागी झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनीदेखील काम बंद ठेवले आहे.
समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. समितीचे निमंत्रक नीलेश दातखिळे, मंदा पडवळ, आरती भुसे, दीपा मुळे, रेश्मा सय्यद, सुजाता गायकवाड आदी उपस्थित होते.
केंद्र शासनाकडून मोबदल्यात वाढ करून द्यावी, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासन आदेशानुसार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना लागू करणे आदी मागण्या केल्या आहेत.
ऑक्टोबर २०१८ नंतर केंद्र शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ केलेली नाही. प्रथम साधने व मोबदला उपलब्ध करून दिल्यानंतर ऑनलाईन कामे करून घेण्यात यावीत, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांवर ऑनलाईन काम करण्याची सक्ती वरिष्ठांकडून केली जात आहे. तरी ऑनलाईन काम करण्याची सक्ती बंद करण्यात यावी. तसेच आदी सुविधा व साधने पुरवावीत, अशी मागणी स्वयंसेविकांनी केली आहे.