न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑक्टोबर २०२३) :- चिखली गावठाण मधील म.न.पा. शाळा मुले व मुली व तळवडे गावठाण शाळा मुले व मुली या ठिकाणी चिखली येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपीठकडे जाणारा १२मी/१८मी रुंद डी.पी. रस्ता, चिखली येथील साने चौक ते चिखली गाव १२मी, २४ मी व ३० मी रुंद रस्ता, चिखली येथील देहू आळंदी ते सोनावणे वस्तीकडे जाणारा ३० मी रुंद डी.पी. रस्ता, चिखली येथील चिखली चौक ते सोनावणे वस्तीकडे जाणारा २४ मी रुंद रस्ता, तळवडे येथील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौकापर्यंत २४ मी रूंद उर्वरित रस्ता, तळवडे येथील तळवडे कॅनबे चौक ते निगडी स्पाईन रस्त्याला जोडणारा १८ मी डी.पी. रस्ता, तळवडे येथील नदीच्या कडेने जाणारा १२.००मी रस्ता व चिखली तळवडे शीवेवरील २४.०० मी. रस्ता या विकास आराखड्यातील रस्त्याची जागा ताब्यात घेण्यासाठी आज गुरुवारी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १०.०० वाजलेपासून ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत जमीन मालक/विकासक जागा ताब्यात देण्यासाठी उपस्थित होते. जागा ताब्यात देणेसंदर्भात जमीन मालकांना नगररचना विभागाने तयार केलेला नकाशा दाखवून त्यांचेकडील ७/१२ नुसार जागेची खात्री झालेनंतर नगररचना विभाग व स्थापत्य विभागाकडून प्रपत्र ‘अ’व ‘ब’ जागेवरच देण्यात आले. तसेच TDR/FSIसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती व कार्यपद्धती समजावून सांगणेत आली.
महानगरपालिकेने शिबिराचे केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे अनेक जागा मालकांनी सोबत आणलेली कागदपत्रे जमा करून लगोलग आगाऊ ताबा देऊन महानगरपालिकेला सहकार्य केले. काही लोकांनी आवश्यक कागदपत्रांची माहिती घेतली असून सदर लोक उद्या (दि. २७) रोजी शिबीरामध्ये उपस्थित राहून ताबा देणार आहेत. आज झालेल्या शिबीरामध्ये १७,२९०.०० चौ.मी. जागा ताब्यात आली आहे व उद्या दिवसभर कॅम्प सुरु राहणार आहे.
आज झालेल्या शिबिराचा प्रतिसाद पाहता लवकरच रस्त्यांचे क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात येईल, अशी आशा आहे. सध्या बाजारामध्ये T. D. R.चे वाढलेले भाव व वाढत्या मागणीमुळे जमीनमालकांचा T. D. R. पोटी जागा ताब्यात देणेचा कल वाढला आहे. वरील रस्त्यांचा भूसंपादन कायद्यान्वये लवकरच निवाडा जाहीर होणार आहे. एकदा निवाडा जाहीर झालेनंतर TDR/FSI चा पर्याय जमीनमालकांना उपलब्ध असणार नाही. त्यामुळे सर्वांनी आपली कागदपत्रे लवकरात लवकर नगररचना विभागाकडे जमा करुन T.D. R. / F. S. I. चा लाभ घ्यावा, असे महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.














