- सी.एस.आर फंडातून निधीची उभारणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोरवाडी येथे दिव्यांग भवन उभारण्यात आले आहे. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून या दिव्यांग भवनाची ओळख निर्माण होणार असून या ठिकाणी दिव्यांगत्वाचे शिघ्र निदान व शिघ्र उपचार, विविध प्रकारच्या अत्याधुनिक थेरेपी जसे ओ.ए.ई, बेरा, ऑडियोमेट्री, फिजियो थेरेपी, अक्युपेशनल थेरेपी, स्पिच थेरेपी यांसारख्या सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साधनांची उपलब्धता, सल्ला व मार्गदर्शन केंद्र, शिक्षण विषयक मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व स्वंय रोजगार, केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य यांच्या विविध योजनांचा लाभ तसेच दिव्यांगांच्या बचत गटाची बांधणी, आर्थिक सामाजिक सक्षमीकरण करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महापालिकेच्या वतीने तसेच विविध स्थानिक दिव्यांग संघटना, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या सहकार्याने होणार आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
या दिव्यांग भवनामध्ये सॅडविक कोरोमंट इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या सी.एस.आर च्या माध्यमातून विविध प्रवर्गातील दिव्यांगाच्या शिघ्र निदान व थेरेपीची यंत्र सामुग्री व साहित्यासाठी सी.एस.आर. उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सॅडविक कोरोमंट इंडिया व महात्मा गांधी सेवा संघ या तीनही संस्थांचा संयुक्त करार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी अतिरीक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, उप आयुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सी.एस.आर तज्ञा श्रुतीका मुंगी, सॅडविक कोरोमंट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी किरण आचार्य, सी. एस. आर तज्ञा रोशनी आचार्य, व्यवस्थापक विघ्नेश अय्यर तर महात्मा गांधी सेवा संघाचे सचिव तथा प्रकल्प संचालक विजय कान्हेकर, समन्वयक अशोक सोंळके आणि देविदास कान्हेकर उपस्थित होते.












