- रेडझोन हे पाप विरोधकांचे; सत्तेत १५ वर्षे असतानाही विरोधकांचे जाणूनबुजून दुर्लक्ष – खा. आढळराव
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १३ एप्रिल २०१९) :- ”भोसरी रेडझोनच्या प्रश्नाचे काय झाले? असा प्रश्न विरोधक मला विचारतात. पण मी त्यांना विचारतो की, केंद्रात दहा आणि राज्यात पंधरा वर्षे तुमच्या पक्षाची सत्ता होती. देशाचे संरक्षणमंत्रीपद तुमच्याकडे होते. मग त्यावेळी का नाही तुम्ही हा प्रश्न सोडवला? मी गेली १० वर्षे रेडझोनचा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. यूपीए सरकारच्या काळात त्यांनी काहीच केले नाही, त्यामुळेच तर मला लोकसभेच्या पिटीशन कमिटीकडे दाद मागावी लागली. पण तरीही या मंडळींनी दाद दिली नाही.
भाजप-रासप-आरपीआय-महासंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे शुक्रवार (दि. १२) रोजी भोसरी दौऱ्यावर होते. यावेळी विरोधकांना प्रत्त्युत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले.
खासदार आढळराव पाटील यांनी मोठ्या संख्येने रॅली काढून, शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी शहर व परिसरातील रूपीनगर, ओटा स्किम, निगडी गावठाण, यमुनानगर, अजंठानगर, त्रिवेणीनगर, कुदळवाडी, जाधववाडी, सेक्टर नं १६, बालाजीनगर, गवळीमाथा, यशवंतनगर, विठ्ठलनगर, नेहरूनगर, उद्यमनगर, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, स्पाईन रोड, संतनगर, इंद्रायणीनगर, गुळवेवस्ती, धावडेवस्ती, सदगुरूनगर, लांडगेनगर, महादेवनगर, चक्रपाणी वसाहत, पोस्ट ऑफीस रोड, जय महाराष्ट्र चौक, शास्त्रीचौक, श्रीकृष्ण मंदीर, दिघीरोड, खंडोपामाळ, आपटे कॉलनी, विकास कॉलनी, लांडेवाडी आदी परिसरांना यादरम्यान त्यांनी भेटी दिल्या.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, ”राज्यात शिवसेना-भाजप एकत्र आले आहेत. देशात नरेंद्र मोदींना पून्हा पंतप्रधान करायचं आहे. त्यामुळे संपूर्ण भोसरीकरांनी व शहरातील नागरिकांनी खा. आढळराव यांच्या पाठीशी उभे रहावे. खासदार आढळराव यांना भोसरी मतदारसंघातून लाखांचे मताधिक्य मिळवून देणार आहे. तसेच आढळराव हे केलेल्या विकासकामांच्या जोरावरच निवडून येणार आहेत, असा आशावादही आमदार लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.
आढळराव पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आल्यावर मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्री झाले. मी त्यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांना समजावून सांगितला, पत्रव्यवहारही केला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रेडझोन भागाचा दौराही केला. त्यांच्या सूचनांनुसार रेडझोनची हद्द कमी करण्याचा निर्णय घेण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती. परंतु दुर्देवाने त्यांना राजकीय परिस्थितीमुळे पुन्हा गोव्यात जावे लागले आणि हा प्रश्न सुटता सुटता राहिला. पण या प्रश्नाचा माझा बराच अभ्यास झाला आहे. त्यामुळे मीच हा प्रश्न सोडविणार आहे, असे आश्वासनही खासदार आढळराव पाटील यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर दिले.
यावेळी खा. आढळराव, आमदार महेश लांडगे, जिल्हाप्रमुख राम गावडे, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, आबा लांडगे, समन्वयक दत्ता साने, नेताजी काशीद, विश्वनाथ टेमगिरे, तुषार सहाने, वेदश्री काळे, सुरज लांडगे, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे व परिसरातील नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.











