न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल) :- महावितरणाचे मुख्य चौकशी अधिकारी सी. आय. ओ., धारावी, मुंबई यांच्या तपासणीमध्ये पुणे प्रादेशिक कार्यालयातील शशिकांत आर. पोफळीकर यांनी अनधिकृतपणे बदली व इतर आदेश काढल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पोफळीकर यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती, पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी महावितरणाचे पुणे, प्रादेशिक संचालक यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
तसेच हे पत्र पंतप्रधान भारत सरकार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सचिव महाराष्ट्र राज्य, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, उर्जामंत्री म.रा., अप्पर सचिव उर्जा विभाग मुंबई,, महासंचालक लाचलुचपत विभाग, मुंबई, पालकमंत्री व अध्यक्ष तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुंबई यांनाही या अर्जाची प्रत सौंदणकर यांनी रवाना केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आपणास माहितच आहे कि, दि . ०१ / ०४ / २०१९ रोजी महावितरण पुणे, प्रादेशिक कार्यालयामध्ये पराडकर, मुख्य चौकशी अधिकारी आणि त्यांचे सहकारी वाडकर यांनी धाड टाकली व त्यामध्ये पुणे प्रादेशिक कार्यालयामधील शशिकांत आर. पोफळकर (व्यवस्थापक मा. स.) यांनी वरिष्ठ अधिकारी यांची मंजुरी न घेता अनधिकृतपणे बदल्या केल्या. तसेच त्या बदल्यांचे आदेश कंपनीच्या महावितरण वेबसाईट (पोर्टल) वर न टाकता स्वत: च्या वैयक्तिक मेलवरून संबंधित अधिका-यांना पाठविल्याचे सिद्ध झाले आहे. सदर बाब महावितरणाच्या सेवाविनियमनुसार अतिशय गंभीर प्रकारचे गैरकृत्य आहे.
पुढील अनियमितता टाळण्याकरिता आपल्या आदेशान्वये शशिकांत आर. पोफळीकर यांचा कक्ष सील केला गेला. परंतु. एस. आर. पोफळीकर यांच्याकडून अजून काही अनियमितता टाळण्याकरिता महावितरण सेवाविनियमच्या कलम ८८ (क) नुसार पोफळीकर यांना तात्काळ निलंबित करणे आवश्यक आहे. परंतु, आपण शशिकांत आर. पोफळीकर यांना पाठीशी घालण्याचा व वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सिद्ध होते.
तरी शशिकांत आर. पोफळीकर यांना तात्काळ निलंबित न केल्यास धरणे आंदोलन करावे लागेल, याची नोंद घ्यावी. तसेच आपण केलेल्या कार्यवाहीबाबत मला अवगत करण्यात यावे, असे या पत्रात सौंदणकर यांनी म्हटले आहे.











