- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या हस्ते शनिवारी होणार उद्घाटन…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२३) :- राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पिंपरी-चिंचवड कार्यालय पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उभारण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन २ डिसेंबरला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याच दिवशी पक्षाचा मेळावाही होणार आहे.
राष्ट्रवादीमधून अजित पवार गट वेगळा होऊन सत्ताधारी भाजपमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीध्ये दोन गट पडले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत शहरातील बहुतांश माजी नगरसेवक व पदाधिकारी गेले आहेत. खराळवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाने ताब्यात घेतले आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने काळेवाडी येथे नवे कार्यालय सुरू केले. त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी पुढाकार घेतला होता. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक तुषार कामठे यांची १६ सप्टेंबर घोषणा झाली. त्यापाठोपाठ ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक व युवकांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाशेजारी पक्षाचे कार्यालय निर्माण करण्याचा विचार पुढे आला. त्यात पिंपरी चौकातील शनी मंदिराशेजारील जागा उपलब्ध झाली आहे. त्या ठिकाणी कार्यालय बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २ डिसेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातील मोकळ्या जागेत पक्षाचा मेळावा घेण्यात येणार आहे. या नव्या कार्यालयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे कार्यालय आमने सामने येणार आहेत.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पक्षाचे कार्यालय असावे, असे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मत होते. त्यानुसार शोध मोहीम राबविल्यानंतर पिंपरी चौकातील शनी मंदिराजवळील इमारतीमध्ये कार्यालयासाठी गाळा उपलब्ध झाला आहे. तेथे सध्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या कार्यालयापासून महापालिका हाकेच्या अंतरावर आहे. आंदोलन करण्याचे पिंपरी चौक हे ठिकाणही जवळ आहे. या कार्यालयाशी संपर्क ठेवणे शहरातील सर्व भागांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना सुलभ होणार आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले.