- मावळातील विकासकामांसाठी खेचून आणला सव्वाचारशे कोटींचा निधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२३) :- मावळातील आंदर मावळ भागातील मुख्य रस्ता असलेल्या कान्हे फाटा-टाकवे-वडेश्वर कुसूर- खांडी-सावळा रस्ता सुधारणा करण्यासाठी तब्बल ३३६ कोटी रुपये तसेच तालुक्यातील इतर विविध विकासकामांसाठी सुमारे ९२ कोटी ९१ लाख असा एकूण ४२८ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी हिवाळी अधिवेशनात मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.
पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण वाढत चाललेल्या आंदर मावळ भागात कान्हे, टाकवे औद्योगिकीकरण त्यानंतर फळणे, वडेश्वर, कांब्रे, नागाथली, वहानगाव, माऊ, डाहुली, कुसवली, बेंदेवाडी, कुसुर, खांडी, निळशी, सावळा अशी लहान मोठी १५ ते २० गावे, वाड्यावस्त्या असून हा संपूर्ण भाग अलीकडच्या काळात पर्यटनाच्या दृष्टीने ओळखला जाऊ लागला आहे.
कान्हे फाटा ते सावळा सुमारे ४३ किलोमीटर अंतर असलेला हा रस्ता पूर्वी टाटा कंपनीच्या मालकीचा होता. त्यामुळे या रस्त्यावर शासकीय निधी टाकता येत नसल्याने हा रस्ता अत्यंत खराब असे. जवळपास १० वर्षापूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच इतका मोठा निधी या रस्त्यासाठी मिळाल्याने आमदार शेळके यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
याशिवाय वडेश्वर येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा संकुलातील मुलीच्या वसतिगृहाच्या बांधकाम (१२ कोटी ५८ लाख), करंजगाव मोरमारवाडी रस्ता ते वांढरमाळ रस्ता (१ कोटी २० लाख), डोंगरवाडी (माऊ) ते वडेश्वर धनगर पठार रस्ता (३ कोटी), पांगळोली ठाकरवस्ती ते धनगर वस्ती रस्ता (४० लाख), माऊ मोरुचे पठार ते सटवाईवाडी रस्ता व लहान पुलाचे बांधकाम (७ कोटी), कामशेत नाणे गोवित्री जांभवली कोंडेश्वर रस्ता (५ कोटी), प्रजिमा ७८ ते नाणे साई घोणशेत टाकवे भोयरे किवळे माळेगाव ते सावळा (५ कोटी) रुपये निधी मंजूर झाला आहे.
या गावांतील कामांसाठी मिळाला निधी
तसेच, मुंबई-पुणे रस्ता सुधारणा करणे (५ कोटी), औंढे देवले पाटण बोरज रस्ता (३ कोटी), सांगवडे- दारूम्ब्रे चांदखेड आढले डोणे येलघोळ – शिवली रस्ता (४ कोटी), प्रजिमा २६ ते ब्राम्हणोली कोथुर्णे शिवली घडवली आर्डव रस्ता (२ कोटी ५० लाख), कामशेत नाणे गोवित्री जांभवली कोंडेश्वर रस्ता (५ कोटी), इंदोरी- नानोली- आंबी- मंगरूळ आंबळे ६ निगडे- कल्हाट भोयरे रस्ता (३ कोटी ५० लाख), सडवली शिवणे डोणे (३ कोटी), नाणे साई घोणसेत टाकवे भोयरे सावळा रस्ता (४ कोटी), क्राळे नानोली रस्ता व इंद्रायणी नदीवर मोठ्या पुलाचे जोडरस्त्यासह बांधकाम (१० कोटी), टाकवे ते भोयरे सावळा रस्ता (३ कोटी ७५ लाख), कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर मोडपुलर शस्त्रक्रिया गृह व मोड्युलर अतिदक्षता विभाग उभारणे (३ कोटी ३६ लाख) या कामांचाही समावेश आहे.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी प्रामुख्याने आंदर मावळ भागाच्या पर्यटनदृष्ट्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध केला आहे. कान्हे येथे सुरू असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर, शस्त्रक्रिया गृह, अतिदक्षता विभागासाठी हिवाळी अधिवेशनात भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.
– सुनील शेळके, आमदार…