- गावाचा विकास करण्यासाठी सक्षम असल्याचा स्थानिकांचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. २८ डिसेंबर २०२३) :- चाकण नगरपरिषदेची प्रस्तावित हद्दवाढ करण्याबाबतचा सुधारित प्रस्ताव जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडून मंत्रालयातील राज्याच्या नगरविकास विभागाला नुकताच पाठवला आहे. या प्रस्तावित करण्यात आलेल्या हद्दवाढीला लगतच्या ग्रामपंचायतीचा प्रखर विरोध आहेत.
प्रस्तावित हद्दीतील १६ गावच्या सरपंच, उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थांचा चाकण नगरपरिषदेत समाविष्ट करण्यासाठी बुधवारी (दि. २०) निघोजे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी चाकण नगरपरिषद हद्दवाढ विरोधात आंदोलनचा इशारा देण्यात आला. चाकण लगतचे ग्रामीण क्षेत्र नगरपरिषदेत समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरु आहेत. नगरपरिषदेच्या हद्दवाढीमध्ये कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी, महाळुंगे इंगळे, खांलुब्रे, आंबेठाण, बिरदवडी, पिंपरी खुर्द, रोहकल, वाकी खुर्द, चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे या गावांचा समावेश करून भविष्यात अनेक मोठ्या समम्या निर्माण होण्यापूर्वीच नगरपरिषदेची हद्दवाढ करून येथील यत्रंणा कार्यक्षम करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत; परंतु ग्रामपंचायतीनी हद्दवाढीस तीव्र विरोध केला आहे.
निघोजे येथील बैठकीत स्थानिक अधिक आक्रमक झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. पुढील दोन दिवसांत यातील विविध ग्रामपंचायतीत ग्रामसभेचा ठराव करून राज्याचे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना निवेदन व ठराव घेऊन भेटणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
एमआयडीसीलगत असलेली निघोजे ग्रामपंचायत व आम्ही आमच्या गावाचा विकास करण्यासाठी सक्षम आहोत, चाकण नगरपरिषदेमध्ये समावेश होण्यास संपूर्ण गावचा विरोध आहे. चाकण परिषद हद्दीतील रस्ते, सांडपाणी, कचरा, पाणीपुरवठा व्यवस्था यांची बोंबाबोंब आहे. त्यामुळे आमच्यावर हा निर्णय लादू नये.
– सुनिता येळवंडे, सरपंच, निघोजे..


















