- तीस ठिकाणी नाकाबंदी, पोलिसांची पथकं सज्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२३) :- नुतनवर्षाच्या स्वागतासाठी पिंपरी, चिंचवड, वाकड, हिंजवडी परिसर, विविध मॉल्स, हॉटेल्स, चर्च याठिकाणी लोक एकत्र येतात. याकरीता नमुद ठिकाणी चेकींग करण्यात येत आहे. संशयीत व्यक्ती, अभिलेखावरील गुन्हेगार चेक करुन योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. ३१ डिसेंबर, २०२३ व नुतनवर्ष स्वागता दरम्यान कोठेही घातपाताची घटना घडणार नाही. चेंगराचेंगरी होणार नाही. नागरीकांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे (विशेषतः महिलांची सुरक्षितता, स्नॅचींग, पिक पॉकेटींग गुन्हयास प्रतिबंध करणे) ही बंदोबस्ताची उद्दीष्टे निश्चित करण्यात आलेली आहेत.बरेच नागरिक घराबाहेर पडून मध्यरात्रीपर्यंत पार्ट्यांचे आयोजन करत असतात. बऱ्याचदा नागरिक नशा करुन वाहन चालवून स्वतःचे तसेच इतरांचे जीवास धोका निर्माण करत असतात. या सर्व बाबींना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उद्या ३१ डिसेंबरच्या रात्री पिंपरी चिंचवड पोलीसांच्या वतीने ३० ठिकाणी कडेकोट नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे.
आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये येणा-या-जाणा-या मार्गावर पोलीस स्टेशन व वाहतूक शाखा, यांचे संयुक्तपणे प्रभावी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वाहतुक शाखेकडून ट्रीपल सीट, मॉडीफाय सायलेंन्सर, ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह व वाहतुक नियमांचे उल्लंघन करणारे यांचेवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गुन्हे शाखेकडून चैन स्नॅचींग, पिक पॉकेटींग व महिला बाबत अपराध करणा-या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ३१ डिसेंबर व नुतनवर्षाच्या स्वागताच्या अनुषंगाने अपोआ, सपोआ, पोनि, सपोनि/पोउपनि, अंमलदार, दामिनी पथक, आरसीपी पेट्रोलिंग मोबाईल, पोउपआ, स्ट्रायकींग, वाहतुक शाखा बंदोबस्त, छेडछाड विरोधी पथक, क्युआरटी, पोउपआ, सपोआ, पोनि, सपोनि/पोउपनि, अंमलदार, नाकाबंदी पाँईट, डी.डी. पथक प्रमाणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
तसेच महत्वाचे व गर्दीच्या ठिकाणी फिक्स पाँईट व पेट्रोलिंगचे आयोजन केलेले आहे. तसेच काही आक्षेपार्ह माहिती मिळाल्यास नागरीकांनी तात्काळ डायल ११२, नियंत्रण कक्ष ०२०-२६२०९१२२/ २६२०९१२७ यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाकाबंदीच्या ठिकाणी प्रत्येक वाहनचालकाची कसून चौकशी करण्यात येणार असुन ब्रेथ अॅनालायझर मशीनच्या साहाय्याने श्वासाचे नमुने तपासण्यात येणार आहेत. दारु पिवून वाहन चालवणाऱ्या प्रत्येक वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यांचे वाहन अटकावून ठेवण्यात येणार आहे. कोणीही नशा करुन अथवा धोकादायकरीत्या वाहन चालवू नये. तसेच नववर्षाचे स्वागत उत्साहाने परंतु शांतपणाने, कायद्याचे पालन करुनच करावे व शांतता राखण्याच्या दृष्टीने आपले योगदान द्यावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीसांचे वतीने करण्यात येत आहे.













