न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२३) :- प्राधिकरणातील उद्यानांच्या परिसरात वाढता टवाळखोरीपणा, विद्यार्थ्यांचे युगल चाळे, गुन्हेगारी गैरकृत्य आता सीसीटीव्ही कमेऱ्यांमुळे नक्कीच आटोक्यात येईल, असे उद्यान परिसरात प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कमेऱ्यांसाठी पाठपुरावा करणाऱ्या प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीला वाटत आहे. उद्यानांमध्ये फिरावयास येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा होणे ह्यामागील प्रमुख हेतू होता.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले. प्राधिकरण परिसरात शाळा महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. शाळा , महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी हे परिसरातील उद्यानांच्या आसपास परिसरात मोठ्या संख्यने एकत्रित होऊन टवाळपणा करताना दिसून येतात. उद्यानांच्या प्रवेश द्वारावर अनेक विद्यार्थी विद्यार्थीनी हे सुरक्षारक्षकाशी हुज्जत घालतानाही बऱ्याच वेळा दिसून येतात त्याचप्रमाणे अनेक अल्पवयीन युगलप्रेमी शालेय वेशात परिसरात बसलेले आढळून येतात. सेक्टर २८ मधील संत ज्ञानेश्वर उद्यानातील ८ कॅमेरे हे लवकरच सुरू होत असल्याने नक्कीच गैरकृत्यांना आळा बसेल, असे वाटते. पालिकेने उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकस्पद आहे.सदरचे कॅमेरे कायमस्वरूपी चालू कसे ठेवता येतील याकडे प्रशासनाने लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते. देखभाल दुरुस्ती व रखरखाव योग्य आणि वेळेवर होणे आवश्यक आहे.”











