- सत्तासंघर्षावर अखेर पडदा पडणार..
- शिंदे सरकार कोसळते की वाचते?; सर्वांच्या नजरा खिळल्या निकालावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १० जानेवारी २०२४) :- शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर आज बुधवारी लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत.
शिवसेना ठाकरे गट की शिंदे गट यातील कोणाचे आमदार अपात्र ठरणार, की काही वेगळा निकाल लागणार याची उत्सुकता आहे. निकाल लागण्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून निकालाची प्रत अंतिम करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे.
निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी रात्री तातडीची बैठक बोलावण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या नव्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या वर्षा निवासस्थानी दाखल झाले. निकाल असल्याने मुंबईसह राज्यभरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
३४ याचिकांची सहा गटात विभागणी करण्यात आली असून सायंकाळी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात निकालाचे वाचन करणार आहेत. ५०० पानांच्या निकालपत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेऊन एक सारांश निकाल ते वाचून दाखवतील. हा साधारण ५-१० पानांचा सारांश निकाल असेल. त्यानंतर निकालाची मूळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना दिली जाईल.