- आधीच्या सात मंडळामध्ये पाच मंडळांची भर..
- प्रशासकीय कारभार होणार गतिमान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२४) :- मावळ तालुक्यातील महसूल मंडळांची पुनर्रचना करण्यात आली असून, यामुळे तालुक्यात याआधी असलेल्या ७ महसूल मंडळांमध्ये वडेश्वर, परंदवडी, टाकवे बुद्रुक, टाकवे खुर्द व कुसगाव बुद्रुक हे ५ नवीन महसूल मंडळ वाढले आहेत. त्यामुळे तालुक्यातील महसूल मंडळांची संख्या दुपटीने वाढली असून, आता तालुक्यात १२ महसूल मंडळ असणार आहेत, अशी माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.
तालुक्यात याआधी वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, खडकाळा, काले, शिवणे, कार्ला व लोणावळा अशी ७ महसूल मंडळ कार्यरत होती. या सात मंडळांच्या अंतर्गत ७१ सजांचा कारभार चालत होता. दरम्यान, दि. १५ फेब्रुवारी २०१८ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी काढलेल्या अंतिम अधिसूचनेनुसार तब्बल ६ वर्षांनी ही कार्यवाही झाली आहे.
दरम्यान, मंडल अधिकारी कार्यालयांचे विभाजन होऊन विस्तारीकरण झाल्यामुळे मंडल अधिका-यांवर असणारा कामाचा ताण कमी होणार असून, तालुक्यातील नागरिकांना मंडल अधिकारी कार्यालय आपल्याजवळ आल्याने सोयीचे होणार आहे. संबंधित नवीन महसूल मंडळांसाठी मंडल अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली असून लवकरच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे.