न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२४) :- निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेतील फुटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला असला तरी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन होणार असल्याने शिंदे यांच्यासमोरील आव्हान अद्यापही कायम आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांच्यासह सर्वच आमदारांना पात्र ठरविले. तसेच निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निर्वाळा दिला.
अपात्रतेची टांगती तलवार दूर झाली असली तरी मुख्यमंत्री शिंदे यांना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागणार आहे. अपात्रतेच्या अर्जावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येते, असे निकाल यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानुसारच ठाकरे गटाने नार्वेकर यांच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे जाहीर केले आहे. फक्त सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवरील सुनावणीला किती काळ लागेल यावर सारे अवलंबून असेल. अध्यक्षांचा निकाल हाती आलाा असला तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्या डोक्यावरील टांगती तलवार अद्यापही दूर झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयात किती वेळ लागतो यावरच शिंदे यांचे भवितव्य अवलंबून आहे.