- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात प्रकाशन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२४) :- संग्राह्य मूल्य असणारे ‘को’वॉर’ हे पुस्तक कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी आत्मविश्वास देणारे, लढण्यासाठी बळ देणारे पुस्तक म्हणून उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आणि ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांच्या ‘को’वॉर लढा जीवन मरणाचा या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. ११) श्री. पवार यांच्या हस्ते पुणे विधान भवनात करण्यात आले. त्यावेळी त्यांनी या पुस्तकासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, लेखक अण्णा बोदडे, राजन वडके, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, राहुल भोसले, शाम लांडे, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
“पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संकटाचा सामना करताना सामूहिक जबाबादारीने केलेल्या कार्याची माहिती ‘को’वॉर पुस्तकाच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा बोदडे आणि वडके यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या काळात आपला जीव धोक्यात घालून लढलेल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान या पुस्तकामुळे होणार आहे,” असे पवार यांनी सांगितले.
“कोरोना संकटकाळातील पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांवर ओढवलेल्या परिस्थितीचा आणि त्या काळात महापालिका, वैद्यकीय, पोलिस आदी प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय व सामाजिक संघटनांनी केलेल्या कार्याचा आढावा घेणारे हे पुस्तक आहे. कोरोना बाधितांचे जीव वाचविण्यासाठी अक्षरशः प्राणांची बाजी लावत उपचार करणारे डॉक्टर, सिस्टर, नर्स, वॉर्डबॉय, मावशा, आशा सेविका या कोरोना वॉरियर्स`नी केलेल्या सेवेचं अभूतपूर्व दर्शन घडले. कोरोना काळातील सामाजिक वास्तव नजरेत, मनांत साठवत होतो. कोरोनाच्या संकटावर मात करत जगण्यासाठी लोकांच्या जीवन-मरणाच्या या लढ्याची कायमस्वरुपी नोंद झाली पाहिजे, या विचारातून `को-वॉर लढा जीवन मरणाचा या पुस्तकाचा जन्म झाला,” असे मनोगत बोदडे आणि वडके यांनी व्यक्त केले आहे.











