- देहू संस्थांनचे राज्यभरातील कीर्तनकारांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. १८ जानेवारी २०२४) :- विविध वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या कीर्तन सोहळ्यात वारकरी सांप्रदायिक आचारसंहिता पाळली जात नाही. साधू, संतांनी परमार्थिक प्रबोधनासाठी सुरू केलेल्या कीर्तन परंपरेच्या विद्रुपीकरणाचे पाप करू नये, असे आवाहन देहूतील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थांनच्या वतीने राज्यभरातील कीर्तनकारांना करण्यात आले आहे.
राज्यभरात विविध ठिकाणी सप्ताह, देव देवता, महापुरूष, पुण्यतिथी, जयंतीनिमित्त कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सध्या वारकरी कीर्तनाचे कार्यक्रम विविध मराठी वृत्तवाहिन्यांवर प्रसारित होत आहेत. यामध्ये काही ठिकाणी कीर्तन सादर होताना वारकरी सांप्रदायिक आचारसंहिता पाळली जात नाही. कीर्तन करण्याची चौकट सांभाळली जात नाही, असे दिसून येते. हे खूप गंभीर आहे.
साधू-संतांनी परमार्थिक प्रबोधनासाठी सुरू केलेल्या कीर्तन परंपरेचे विद्रुपीकरणाचे पाप वृत्तवाहिन्या, निर्माते, कीर्तनकार यांनी करू नये, असे आवाहन संस्थांनने जाहीर निवेदनाद्वारे केले आहे.















