- मूर्तीच्या चेहऱ्याभोवती गुंडाळण्यात आलयं कापड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
अयोध्या (दि. 19 जानेवारी 2024) :- १८ जानेवारी रोजी गर्भगृहात प्रभू श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. ज्याचा पहिला फोटो देखील समोर आला आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी त्यांचे आसनही तयार करण्यात आले आहे. रामलल्लाचे आसन ३.४ फूट उंच आहे, जे मकराना दगडाने बनलेले आहे.
अयोध्योत बांधण्यात आलेल्या मंदिरात ठेवण्यासाठी तीन मूर्तीकार मूर्तीवर काम करत होते. या तीन पैकी एका मूर्तीची निवड करण्यात आली होती. ही मूर्ती म्हैसूर येथील शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. दरम्यान १६ तारखेपासूनच राम मंदिरात विविध पूजा विधींची सुरुवात झाली आहे. होम-हवन पार पाडले जात आहेत. २२ तारखेला तर भव्य सोहळा भारतीयांना पाहायला मिळेल. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी रामललाच्या अभिषेकाचा विधी पार पडला. बुधवारी सकाळी दहा किलो वजनाची रामललाची मूर्ती मंदिराच्या आवारातून बाहेर काढण्यात आली. मूळ मूर्तीचे वजन खूप जास्त असल्याने ही प्रतिकृती मंदिर परिसरात फेरफटका मारण्यासाठी नेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी उशिरा रामललाची खरी मूर्तीही मंदिरात पोहोचली. कडेकोट बंदोबस्तात ट्रकमधून मूर्ती मंदिरात आणण्यात आली. त्यानंतर गुरुवारी गर्भगृहात त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
सध्या मूर्तीच्या चेहऱ्याभोवती कापड गुंडाळण्यात आले आहे. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दरम्यान, येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
या दिवशी देशभरात सुट्टी द्यावी अशी मागणी केली जात होती. अखेरीस केंद्र सरकारने 22 जानेवारीच्या दिवशी अर्धी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे अर्धा दिवस शासकीय कार्यालय सुरू राहणार आहे. केंद्र सरकारने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. या पत्रामध्ये सुट्टीचा उल्लेख केला आहे.











